• Mon. Aug 18th, 2025

शिंदे-फडणवीस सरकार ठेवणार बॉलिवूडवर अंकुश; मनोरंजनसृष्टीसाठी नवी नियमावली लागू

Byjantaadmin

Feb 16, 2023
शिंदे-फडणवीस सरकार ठेवणार बॉलिवूडवर अंकुश; मनोरंजनसृष्टीसाठी नवी नियमावली लागू

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉलिवूडला चांगले दिवस आले असले तरी सोशल मीडियावर अजूनही बॉलिवूडविरोधात वक्तव्य केली जात आहेत. एकूणच गेल्या एक दोण वर्षांपासूनच बॉलिवूडवर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत. मग ते चित्रपटाची कथा कारण असो, नेपोटीजम असो किंवा कंपूशाही असो किंवा इंडस्ट्रीमधील राजकारण असो. शिवाय गेल्यावर्षी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा फटकासुद्धा मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बसला.

आता बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार, कामगार, निर्माते यासगळ्यांना एक नवी नियमावली लागू करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे आता बॉलिवूडमधील कलाकारांवर आणि त्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी एक नवी नियमावली जाहीर करणार आहेत.

बॉलिवूडमध्ये समान वेतनाची गंभीर समस्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यसरकारच्या नियमानुसार आता प्रत्येकाला समान वेतन देणं हे निर्मात्यांना भाग पडणार आहे, इतकंच नाही तर मनोरंजनसृष्टीतील कामगारांना काम बंद करून निर्माते आणि दिग्दर्शकांना जाबही विचारता येणार आहे. याबरोबरच मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र नवं पोर्टलही तयार करण्यात येणार आहे.

केवळ चित्रपटच नव्हे तर मालिका, जाहिराती, ओटीटी क्षेत्रातसुद्धा हे नियम लागू होणार आहेत. शिवाय महिला कलाकार आणि कामगारांना घरपोच वाहतूक सुविधा पुरवायचेसुद्धा आदेश राज्यसरकारने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील लोकांच्या समस्या समोर येत होत्या. त्यावरच विचार विनिमय करून शिंदे-फडणवीस सरकारने सांस्कृतिक विभागाची मदत घेत ही नवी नियमावली तयार केली आहे. लवकरच यासंबंधीत अधिकृत माहिती सरकारच्या वतीने देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *