आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये ये-जा सुरू केली आहे.
असे असतानाच आता (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाची चर्चा सुरू झाली आहे. येथे रक्षा खडसे या खासदार आहेत. मात्र, तरी देखील त्यांच्या तिकीटाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार की नाही यावर थेट रक्षा खडसे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, ”मला वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. एक वर्षापेक्षा कमी वेळ यासाठी राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्र देखील लोकसभा उमेदवारीबाबत वेगवेगळे विषय समोर येत आहेत. पण रावेर लोकसभा निवडणुकीबाबत सध्या पक्षात कोणतीच चर्चा नाही”.
”मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य असेल. त्या अनुषंगाने आम्ही काम करू. आज खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावर आहे. तसेच भविष्यातही पक्षाने मला ही जबाबदारी दिली तर याच विश्वासाने मी काम करेन. पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तरही मी प्रामाणिकपणे काम करेन”, असं त्या म्हणाल्या.
”आज अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट मिळाले तर मी त्यांच्यासाठी काम करेन. आणि मला तिकीट मिळालं तर ते माझ्यासाठी काम करतील”, असं स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलं.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी BJP ची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादीत आहेत तर त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. तसेच त्या विद्यमान खासदार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसेंना भाजप तिकीट देणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर खुद्द रक्षा खडसे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.