महाराष्ट्र महाविद्यालयात हैद्राबाद मुक्तीसंग्रामावरील ग्रंथ व दुर्मीळ वृत्तपत्रांचे प्रदर्शन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात इतिहास विभाग, आजादी का अमृत महोत्सव समीती, रासेयो व ग्रंथालय विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर आणि कुमारस्वामी महाविद्यालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने हैद्राबाद मुक्तीसंग्राम विषयावरील ग्रंथ व दुर्मिळ वृत्तपत्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हैद्राबाद मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले. हैद्राबाद संस्थानाच्या विरोधातील स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटना प्रसंगांना उजाळा देणारे दुर्मीळ वृत्तपत्र कात्रणे हे या प्रदर्शनाचे विशेष होते. या वृत्तपत्रांमध्ये केसरी, सोलापुर समाचार, ज्ञानप्रकाश, पुढारी, लोकमान्य, कल्पतरू या वृत्तपत्रांमध्ये हैद्राबाद संस्थानातील मुक्तीलढ्याचे वर्णन करणारे अनेक लेख भित्तीपत्रकांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनात अत्यंत दुर्मीळ असलेले काळाच्या पडद्याआड, द लास्ट निजाम, कहाणी हैद्राबाद लढ्याची, अनंत भालेराव लिखीत आलो याची कारणासी, हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा हिप्परगे, स्वातंत्र्य सैनिक तरीत्रकोश, स्वामी रामानंद तीर्थ षष्ठब्धीपूर्ती यासारखे मौलीक ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत इतिहास विषयातील हैद्राबाद मुक्तीसंग्रामावरील विविध विषयांवर संशोधन झालेले प्रबंध या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
या ग्रंथ व दुर्मिळ वृत्तपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे प्रमूख मार्गदर्शन करताना औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील पुरी यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित केले. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले तर आभार डॉ. विठ्ठल सांडूर यांनी व्यक्त केले. या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी आजादी का अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, ग्रंथपाल मीनाक्षी बोंडगे, रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परीश्रम घेतले.