…अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयात हातात दंडुके घेऊन घुसु-अभय साळुंके यांचा विमा कंपनीला इशारा
निलंगा (प्रतिनिधी):-खरीप हंगामातील सोयाबीन या नगदी पीकाचे नुकसान होऊन शेतकरी आडचणीत सापडला असताना किमान वीमा तरी भरघोस मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असताना वीमा कंपणीने तुटपुंजा वीमा शेतकऱ्यांच्या पदरात टाकून एकप्रकारे फसवणूक केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप निलंगा, देवणी, शिरुर-अनंतपाळ तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांना वीम्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. हि बाब सहन न होण्याजोगी असल्याने सोमवार पासून आम्ही काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीच्या कार्यालयात हातात दंडुके घेऊन घुसू असा इशारा काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी दिला. तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
अॅगस्ट महिन्यात झालेला ढगफुटी सदृश्य पाऊस, लगेच मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव अन शेवटी परतीचा पाऊस अशा संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. जवळपास ८० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामे करून जवळपास निलंगा तालुक्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती अहवालातून दिली. त्यानुसार राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. विम्यासाठी ७२ तासाच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्यक असल्याची माहिती शेतकऱ्यांना कळविण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी माहितीही विमा कंपनीला आॅनलाईन कळवली. विमा कंपणीच्या प्रतिनिधी यांनी गावोगावी जाऊन पंचनामेही केले. जवळपास वीमा कंपणीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा लिहून ८० टक्के नुकसान दाखवले परंतु प्रत्यक्षात मात्र १५ ते ३० टक्के नुकसान भरपाई देत हेक्टरी ८ ते १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जात आहे. निलंगा तालुक्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी वीमा भरला होता तेवढ्याच शेतकऱ्यांनी नुकसानीची माहीती वीमा कंपणीला कळवली होती परंतु अद्याप निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांना अद्याप वीमा मिळाला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने आंदोलने केली तरीही त्याची दखल वीमा कंपणी घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सोमवार पर्यंत जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वीम्याची रक्कम जमा झाली नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक वीमा कंपणीच्या कार्यालयात आम्ही सर्व काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात दंडूका घेऊन घुसू व वीमा कंपणीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरून फिरणे मुश्किल करु असा इशारा निवेदनात अभय साळुंके यांनी दिला जातो.