अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या रायपूर येथे नियोजित राष्ट्रीय अधिवेशनासाठी शनिवारी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राजकीय व्यवहार उपसमितीचे निमंत्रक तसेच मसुदा समितीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र सत्यजित तांबे उमेदवारीप्रकरणी आरोप झालेल्या व विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा सादर केलेल्या बाळासाहेब थोरात यांना एकाही समितीत स्थान दिलेले नाही.
२४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान रायपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी गठित केलेल्या विविध समित्यांची यादी शनिवारी (११ फेब्रुवारी) जाहीर झाली. या समित्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचाही समावेश आहे. अशोक चव्हाण यांच्यासमवेत खासदार मुकुल वासनिक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील मसुदा समितीचे सदस्य असतील. वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे.
राजकीय व्यवहार उपसमितीमध्ये नसीम खान व आमदार यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. आर्थिक व्यवहार उपसमिती मध्ये माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले शेतकरी व कृषी उपसमितीचे सदस्य आहेत. खासदार मुकूल वासनिक अध्यक्ष असलेल्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमिती मध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे व आमदार विजय वडेट्टीवार हे आहेत. युवक, शिक्षण व रोजगार उप समिती मध्ये माजी मंत्री वर्षा गायकवाड आहेत.
थोरातप्रकरणी आज बैठक राज्य प्रभारी एच. के. पाटील रविवारी बंगळुरू येथून मुंबईत येत आहेत. परळच्या टिळक भवनात बैठक असून बाळासाहेब थाेरात यांच्याशी ते स्वतंत्र बैठक करणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांची मते घेऊन पक्षश्रेष्ठींना थोरातांच्या राजीनाम्यासंदर्भात अहवाल पाठवणार आहेत.