शेतकऱ्यांना पिकविमा वाटपास सुरुवात, युवासेनेचा दणका
निलंगा: शेतकऱ्यांना पिकविमा तात्काळ वाटप करावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी व जिल्हा विमाप्रतिनिधी यांना करण्यात आली होती व तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याचीच दखल घेऊन पिकविमा कंपनीने शेतकऱ्याना पिकविमा वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
लातूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीस विमा भरून सुद्धा आजतागायत शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता. काही शेतकऱ्यांनाच पिक विमा कंपनीने विमा वितरित केला होता. जवळपास 60 टक्के शेतकरी पिकविम्यापासून वंचित होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे सोयाबीनचे पीक हातून गेले असल्यामुळे शेतकरी हाताश झाला होता. त्यातच सावकाराकडून व्याजाने पैसे काढून रब्बीची पेरणी केली. विमा मिळेल या आशेने शेतकरी वाट पाहत होता. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी जिल्हाधिकारी व पिकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना भेटून व शिवसेना व युवा सेनेच्या वतीने निवेदन देऊन पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करा अन्यथा शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचीच धास्ती घेऊन विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यावर पिकविमा वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नुकसानीच्या प्रमाणात पिकविमा मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. युवासेनेच्या निवेदनाची दखल घेऊन पिकविमा कंपनीने पीकविमा वाटपास सुरुवात केल्याबद्दल शेतकऱ्याकडून युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शेतकऱ्यांना पिकविमा वाटपास सुरुवात, युवासेनेचा दणका
