• Sat. May 3rd, 2025

आपणहून युतीसाठी पुढे जाणार नाही कोणी हात  पुढे केला तर विचार करू :  महादेव जानकर 

Byjantaadmin

Feb 12, 2023

आपणहून युतीसाठी पुढे जाणार नाही कोणी हात

पुढे केला तर विचार करू :  महादेव जानकर
लातूर :  राज्यात निवडणुका  लढवताना आपण स्वतःहून युतीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे जाणार नाही. आपल्याकडे त्याकरिता कोणी हात पुढे केला तर विचार करू,असे प्रतिपादन  माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर  यांनी शनिवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी शनिवारी महादेव जानकर  लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी, पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने याठिकाणी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना जानकर पुढे  म्हणाले की, २००३ साली स्थापन केलेल्या आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे गावपातळीवर संघटन वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत.पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या पक्षाच्या यशाचा आलेख सतत चढत्या क्रमाने राहिला आहे हे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो. रासप महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये मान्यताप्राप्त प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढविल्यानंतर राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी टक्केवारी आपला पक्ष निश्चित गाठेल, असेही जानकर  म्हणाले. सध्या तीन राज्यात रासप  मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. आणखी दोन राज्यात जनाधार मिळाला की रासप राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्ष होऊ शकेल, असा विश्वास महादेव जानकर यावेळी यांनी व्यक्त केला.
आरक्षण , मग ते धनगर असो की अन्य कोणत्याही जातीसाठीचे असो, आरक्षण मिळवून घेण्यासाठीपक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे. आपला पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. केंद्राने आता कंत्राटी पद्धतीचा अवलंब  करणे सुरु केल्याने आरक्षण संपत चालल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला आरक्षण मागताना इतर जातीवर कोणताही अन्याय नाही झाला पाहिजे, या विचाराने आपण चालतो ,असे सांगून राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  आपण स्वबळावर लढवणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
        याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव दत्तामामा सुरनर , मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, लातूर लोकसभेचे प्रभारी आश्रुबा कोळेकर, मराठवाडा महासचिव संजय  भोसले, बीड लोकसभेचे प्रभारी प्रा. महेश चैरे, जिल्हा संपर्क प्रमुख रामराव रोडे, लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके, दादासाहेब करपे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *