• Sat. May 3rd, 2025

शिवसेनेचा PM नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

Byjantaadmin

Feb 11, 2023

शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या कालच्या भाषणावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.

सामनात म्हटले की, अत्यंत टोकाची मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी चिखलाने माखलेली टीका क्वचितच होत असे. आता काय चित्र आहे? मागील सात-आठ वर्षात तर राजकीय विरोधक म्हणजे शत्रू, सरकारचे टीकाकार म्हणजे देशद्रोही असे एक‘नरेटिव्ह’ तयार केले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. अदानी प्रकरणावरील मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले.

काँग्रेस भोवतीच भाषण फिरत राहिले
सामनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. म्हणजे भाषण ठोकले. लोकसभेत बोलताना जसा त्यांनी अदानीचा ‘अ’ देखील उच्चारला नाही तसेच त्यांनी राज्यसभेतही केले. काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरू घराणे, आधीच्या काँग्रेस सरकारांवरील टीका या भोवतीच त्यांचे भाषण फिरत राहिले.

तुमच्याजवळही चिखलच

 

सामनात म्हटले की, एके ठिकाणी ‘चिखल’ आणि ‘कमळ’ यांचा त्यांनी उल्लेख केला. ‘किचड उनके पास था, मेरे पास गुलाल! जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल,’ असे पंतप्रधानांनी मोठय़ा शायराना अंदाजामध्ये सांगितले. तुमच्याजवळ गुलाल होता आणि तो तुम्ही उधळला अशी बढाई तुम्ही मारली खरी, परंतु तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच तुम्ही फेकला.

पंतप्रधानांनी उधळलेला ‘गुलाल’

सामनात म्हटले आहे, एकीकडे हिंदुस्थानची उभारणी अनेक पिढय़ांच्या श्रमातून आणि घामातून झाली असे सांगायचे आणि दुसरीकडे आधीच्या सरकारांनी देशाचे वाटोळे केले, असा चिखल फेकायचा. पंडित नेहरू महान होते असेही म्हणायचे आणि नेहरू-गांधी घराण्याच्या नावाने बोटेही मोडायची. कलम 370 वरून त्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करायचे. पुन्हा कलम 370 चे लाभार्थी कोण, हे मला सांगायला लावू नका, अशी धमकीही द्यायची. ही धमकी म्हणजे पंतप्रधानांनी उधळलेला ‘गुलाल’ होता, असे जर सत्ताधारी मंडळींना वाटत असेल तर प्रश्नच संपला.

टीका-प्रत्युत्तर लोकशाहीच

सामनात म्हटले आहे, राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यातील दावे-प्रतिदावे, डाव-प्रतिडाव, टीका-प्रत्युत्तर हे लोकशाही व्यवस्थेचेच भाग आहेत. त्यामुळे या शाब्दिक युद्धात गैर काहीच नाही. या आधीच्या काळातही सत्ताधारी-विरोधक यांच्यात टोकाची शब्दयुद्ध झालेलीच आहेत, परंतु त्यातही किमान चौकटीचे भान सगळेच पाळत असत. परस्परांवर आरोपांची ‘राळ’ उडविली गेली तरी वेळप्रसंगी एकमेकांवर कौतुकाचा ‘गुलाल’ही उधळला जाई.

‘चिखलाचा वास’ नव्हता

सामनात म्हटले आहे, आपल्यावर कठोर टीका करणाऱयांची भाषणे पंडित नेहरू सभागृहात येऊन ऐकत असत. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेदेखील काँग्रेस आणि नेहरूंचे टीकाकारच होते. एकदा पं. नेहरू यांनी जनसंघावर टीका केली तेव्हा वाजपेयी नेहरूंना म्हणाले की, ‘तुम्ही शीर्षासन करता हे मला माहिती आहे. त्याबद्दल मला आक्षेपही नाही, परंतु कृपा करून माझ्या पक्षाची प्रतिमा उलटी पाहू नका.’ अटलजींच्या या उत्तरावर नेहरूदेखील खळाळून हसले होते. नेहरू यांची टीका आणि त्याला अटलजींचे उत्तर तोडीस तोडच होते, पण त्याला कुठेही ‘चिखलाचा वास’ नव्हता.

तो ‘गुलाल’ होता का?

सामनात म्हटले आहे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायचे? गुरुवारच्या राज्यसभेतील भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी ‘नेहरू जर महान होते, तर त्यांच्या वारसांना नेहरू आडनाव लावण्यात लाज कसली?’ अशी टीका केली. तो ‘गुलाल’ होता असे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला म्हणायचे आहे का? असा सवाल शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *