कोणाला काहीही आवडेल. मात्र आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवरुन टोला लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल. पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, तेवढी संख्याही नाही. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
लंकेनी केले होते आवाहन
अजितदादांना मुख्यमंत्री करायचेय, त्यामुळे कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जाहीर कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना केले होते. आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असे जाहीरपणे बोलून दाखवले. निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते.
राऊत, देशमुखांना विनाकारण जेलमध्ये टाकले
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, अनिल देशमुख 1 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात होते. संजय राऊत यांनाही विनाकारण जेलमध्ये टाकले. काँग्रेसमध्ये वाद नाही, चर्चा होत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला होता. अशी टीका पवारांनी केली.
मोदींनीच विचार करावा
शरद पवार पुढे म्हणाले, मोदी यांच्या मुंबईत येण्याने राज्याचे हित होत असेल, राज्याला काही मिळणार असेल तर त्यांच्या येण्याला आमची काही हरकत नाही. मात्र ते येथे येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा.
शहांच्या दौऱ्यावरुन टीका
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याबाबत शरद पवार म्हणाले, देशाच्या गृहमंत्र्याला 2-2 दिवस पोटनिवडणुकीसाठी घालवावे लागतात. याचा अर्थ आमचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगले काम करत आहेत. शिवाजी महाराजांचे जे शौर्य होते ते अफजलखानामुळे समोर आले असे जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले