लातूर – पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा:आमदार धिरज देशमुख यांची केंद्र सरकारकडे मागणी
लातूर : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे आणि शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केंद्र सरकारकडे शुक्रवारी केली. हा निर्णय दोन शैक्षणिक केंद्रांना जवळ आणणारा व विद्यार्थीहिताचा ठरेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील व्यापारी केंद्र आणि तीर्थस्थळांना जोडण्यासाठी राज्यांतर्गत मुंबई – शिर्डी, मुंबई – सोलापूर या मार्गावर अत्याधुनिक सुविधा असलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू झाली आहे. यामुळे शिर्डी बरोबरच सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना भेट देवून दर्शन घेणे सोपे होणार आहे. याच धर्तीवर शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुणे-लातूर या शहरासाठी राज्यांतर्गत तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी केली असल्याचे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेसचे डबे लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्याचे नियोजन सरकार करीत आहे. या शहरासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली तर दररोज लातूरमधून पुण्याला ये-जा करणाऱ्या शेकडो व्यापारी, शेतकरी, कामगार यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिलासा मिळेल, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.