कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मारक
सर्वच क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील
स्मारक अनावरण सोहळ्यास माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या शुभेच्छा
लातूर (प्रतिनिधी) :हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे गुरुवार दि.९ फेब्रुवारी रोजी निलंगा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होत आहे, ही मनस्वी आनंद देणारी ऐतिहासिक घटना आहे. या सोहळ्यास मन:पुर्वक शुभेच्छा देत असल्याचे माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण सोहळ्यास शुभेच्छ देण्यासाठी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अत्यंत कणखर, संघर्षशील आणि चारित्र्यसंपन्न मुरब्बी, धुरंदर, अभ्यासू नेतृत्व होते. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी समाजकारण आणि राजकारणात मोठी झेप घेतली होती. निलंगा, लातूर जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून विविध योजना राबवल्या आहेत. निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पापासून, निम्न तेरणा, उजनी ते विदर्भातील गोसीखुर्द असे अनेक सिंचनाचे प्रकल्प त्यांनी उभा केले. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ त्यांच्याच प्रयत्नातून कार्यान्वित झालेले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्यभर ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, निष्ठा आणि प्रमाणिकपणामुळे नेहरू, गांधी घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. पक्षाच्या जडणघडणीत त्यांची तपश्चर्या आणि श्रम मोलाचे ठरले आहेत. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, विचार आणि कार्य समाजातील सर्वच घटकासाठी आणि विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी अनुकरणीय आहे. मागच्या अनेक दशकापासून निलंगेकर आणि देशमुख कुटुंबीयांचे पारिवारिक संबंध राहिले आहेत. त्यांच्या एकूण कारकीर्दीकडे पाहत आम्हालाही बरेच काही शिकायला मिळाले आहे.
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेले आणि आज या अनावरण होत असलेले आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मारक सामाजिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायम प्रेरणा देत राहील, ही माझी भावना असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन समितीने अगत्यपुर्वक पाठवलेले निमंत्रण मिळाले आहे. मात्र याच दिवशी पुर्वनियोजीत न टाळता येणारा कौटुंबिक विवाह सोहळा असल्यामुळे इच्छा असूनही या स्मारक अनावरण सोहळ्यास उपस्थित राहता येणार नाही. यासंदर्भाने स्नेही श्री अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माहीती दिली असल्याचेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.