• Wed. Apr 30th, 2025

महाराष्ट्राला दिशा देणारे कर्मयोगी नेते: डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब

Byjantaadmin

Feb 8, 2023

महाराष्ट्राला दिशा देणारे कर्मयोगी नेते: डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब

 

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशातील काँग्रेस पक्षाच्या नामवंत नेत्यापैकी एक निस्वार्थी, चारीत्र्यसंपन्‍न, निर्व्यसनी नेतेे मा.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते. त्यांच्या परिवारामध्येच आर्य समाजी संस्कार असल्यामुळे मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यासाठी जिद्दीने संघर्ष करण्याचे मौलीक कार्य केले होते.
पूर्वी निलंगा तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा गड होता. आमदार कै.श्रीपतराव साळुंके हे संघर्षमय लढणारे प्रतिस्पर्धी होते. वैचारिक लढाईचे नेहमी संघर्षामध्ये होत असे, त्यामुळे साहेबांमध्ये संघर्षाचा गुण या परस्थितीमधून तयार झालेला असावा याची प्रचिती राज्यातील काँग्रेस अंतर्गत संघर्षामध्ये लोकनेते कै.वसंतदादा पाटील यांच्या बाजूने अनेकदा खंबीरपणे उभा राहण्याच्या घटना असोत किंवा उस्मानाबाद जिल्ह्याातील जिल्हा बँकेची, किल्‍लारी साखर कारखाण्याची व इतर निवडणुकीमधून जाणवत असे, साहेबांचा स्वभाव आपल्या कार्यकर्त्याना, सहकार्‍यांना सन्मान व पूर्ण शक्‍ती देण्याचा होता. सामान्य जनतेचे प्रश्‍न निरपेक्षपणे रात्री उशिरापर्यंत व तेवढ्याच तन्मयतेने समजून घेत असलेले आम्ही अनेकदा पाहिले आहे.
महाराष्ट्राच्या प्रश्‍नाची प्रचंड जाण असणारा नेता
निलंगेकर साहेब हे सामान्य नागरिक वरिष्ठ अधिकारी, नेते यांच्या सहवासात व प्रत्यक्ष फिल्डवरती जात गेल्यामुळे त्यांना सिंचन, रस्ते, आरोग्य, ग्रामविकासाबरोबरच सर्व प्रश्‍नाचा प्रचंड अभ्यास होता. त्यामुळे कोणी चुकीची माहिती देऊन प्रश्‍नाला बाजूला करू शकत नव्हते, हे आम्ही पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रासहित मराठवाड्यात व उस्मानाबाद- लातूर जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाची निर्मिती केली. लातूरचा मांजरा, तावरजा, निम्न तेरना, विदर्भातील घोशी खूर्द अनेक प्रकल्पाला त्यांनी गती दिली व काही प्रकल्प पूर्ण केले मराठवाड्यामध्ये कोल्हापूरी बंधारे निलंगेकर साहेबांनीच आणले. लातूरचा भातखेडा, कव्हा, तावरजा, धरणाची उंची वाढविणे, गिरकसाळ, औराद असे बंधारे, धरणे त्यांच्यामुळेच झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी जूना उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अनेक रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. दुग्धविकास मंत्री असताना लातूर जिल्ह्यासाठी दुग्ध प्रक्रिया उद्योग व कार्यालये निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
लातूर जिल्ह्याचे निर्माते निलंगेकर साहेब.
मुख्यमंत्री ए.आर.अंतुले साहेब यांच्या मंत्रीमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याचे मंत्री म्हणून ते एकमेव मंत्री होते. त्यांना लातूर जिल्हानिर्मिती किती आवश्यक आहे. हे त्यांना पटवून दिले एक भव्य कार्यक्रम घेऊन त्यात अंतुले साहेब यांना बालावले. त्यावेळी मी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो.

त्यामुळे स्टेजवर असताना मुख्यमंत्री बॅ.अंतुले साहेब म्हणाले की, निलंगेकर साहेब लातूरच्या जनतेची मागणी जिल्हा निर्मितीची आहे, मी जिल्हा निर्मितीचा शब्द दिला अशी घोषणा केली. याबरोबरच जिल्हा कार्यालय अधिकारी निवास व्यवस्था, पोलीस ट्रेनिंग सेंटर, अशा कितीतरी योजना त्यांनी मंजूर केल्या व पूर्ण करून दिल्या. लातूर जिल्ह्याबरोबर जालना व परभणी जिल्हा निर्मितीमध्ये निलंगेकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
औरंगाबाद हायकोर्टाचे जनक निलंगेकर साहेब.
मराठवाड्याच्या विकासामध्ये निलंगेकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी विविध विकास कामाला विभागात मदत केली. त्याप्रमाणे औरंगाबादला हायकोर्ट व्हावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्याकडे प्रयत्न केले हे साहेब आम्हाला सांगत असत. त्यांच्या आग्रहामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाने औरंगाबाद हायकोर्टाला मान्यता इंदिराजीनी दिली. मराठवाड्यासाठी जे मुंबई हायकोर्ट होते ते साहेबामुळे औरंगाबादला झाले त्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा त्यानी करून दिल्या. त्यामुळे आज औरंगाबादमध्ये आमचे अनेक ग्रामीण भागातील सामान्य, शेतकर्‍यांची मुले तिथे वकीली करीत आहेत. हे सर्व निलंगेकर साहेबामुळे घडले. निलंगेकर साहेबांना सन 1985 साली काँगे्रस पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे आम्ही त्यांची मनस्थिती जवळून पाहिली अत्यंत शांततेणे त्यांनी पक्षाच्या हाय कमांडचा निर्णय मान्य केला. त्यांची निष्ठा गांधी घराण्यावर व काँग्रेस पक्षावर पूर्णपणे होती. त्यांच्यावरती लोकसभा निवडणुकीत विरोध केला असा आरोप केला जात असे परंतू आम्ही जवळून अनुभवले आहे की, त्यानी कधीही विरोध करण्यासाठी आम्हाला अथवा इतराना सांगितले नव्हते. त्यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. त्या वेळेस कै.दिलीपराव पाटील यांना पक्षाने तिकीट दिले त्यांच्या पूर्ण निवडणुकीत आम्ही 50 गावे फिरून प्रचार केला होता. दिलीपराव 60 हजारापेक्षा अधिक मतानी निलंगेकर साहेबांच्या सहानुभूतीमुळे निवडून आले होते.
जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना बोरी, जेवळी, लातूर, निलंगा येथे भव्य शेतकरी मेळावे आयोजित केले होते. त्याला मा.निलंगेकर साहेब उपस्थित राहून आम्हाला सन्मान देत, प्रोत्साहित करत. सामान्य जनतेच्या प्रश्‍नाला न्याय देत. मी सन 1986 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. त्यावेळेस जागतिक युवक परिषद मास्को येथे झाली. त्या परिषदेला जाण्याची संधी साहेबामुळे मिळाली होती ते आम्हाला मुलासारखे वागवत, सन्मान देत, मदत करत असत.
महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली. त्यावेळसचे मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या जागी निलंगेकर साहेब आमदार नसताना त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. ही त्यांची पक्षनिष्ठा गांधी परिवार व वसंतदादा पाटील यांच्यावरील विश्‍वासाचा परिणाम होता.
साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाड्याच्या व लातूर जिल्ह्याच्या विकासाला खूप गती मिळाली. लातूर शहरामध्ये आम्ही रथामध्ये भव्य मिरवणूक काढली. हजारो लोकाचा जनसमुदाय या कार्यक्रमात सहभागी झाला होता. लातूरच्या विकासाला पूर्ण चालना दिली जाईल, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला जाईल असा विश्‍वास त्यांनी दिला. साहेब मुख्यमंत्री असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन मुंबई येथे झाले. त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. मी त्या वेळेस प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. त्यामुळे साहेबांनी आम्हाला अधिवेशनामध्ये प्रमुख व्यवस्थेची जबाबदारी दिली होती. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सहवासात जाण्याची संधी मिळाली.
मा.निलंगेकर साहेबांनी मला उस्मानाबाद जिल्हा युवक काँगे्रसचा अध्यक्ष करण्याची शिफारस प्रदेश अध्यक्ष मा.रंजीत देशमुख यांच्याकडे केली. त्यामुळे मला राज्यस्तरावर कार्य करण्याची व जागतिक युवा परिषद रशियातील मास्को येथे जाण्याची संधी मिळाली. लातूर मार्केट कमिटीचा अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक कार्य साहेबांमुळेच मला करता आले. साहेब हयात असेपर्यंत आम्हाला आपुलकीचे,परिवाराचे प्रेम दिले ही आठवण माझ्या कायम स्मरणात आहे.
आज राज्याला व देशाला पुढे घेऊन जाण्याची प्रामाणिक, समर्पित भावनेने कार्य करणार्‍या काही नेत्याला अनुभवण्याची संधी मिळाली. यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, मधूजी दंडवते, बापूसाहेब काळदाते, प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे साहेब, वसंतदादा पाटील साहेब व आजरोजी भारत देशाचे पंतपप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब, मा.शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठपणे कार्य करीत आहेत. यातूनच तरूणांना, जनतेला प्रेरणा मिळेल व भारताला महासत्ता बनण्याची संधी मिळून राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदाचे स्वप्न भारत 21 व्या शतकात जगाचे नेतृत्व करेल, असा मला पूर्ण विश्‍वास वाटतो.

शिवाजीराव पाटील कव्हेकर
माजी आमदार, लातूर तथा
भाजपा किसान मोर्चा गोवा राज्य प्रभारी
मो.9822588999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *