• Wed. Apr 30th, 2025

धावत्या शिवशाही बसचा टायर फुटला, चालकाचा बसवरील ताबा सुटला अन् …

Byjantaadmin

Feb 8, 2023

बीड : बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणाऱ्या चालत्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने बसचा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीवरून या अपघातात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – पंढरपूर महामार्गावरील तेलगाव कारखाना परिसरात आज पहाटे झाला आहे. दरम्यान, यावेळी चालकाने सतर्कता बाळगल्याने बस ही दुभाजकामध्ये अडकल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

सध्या बीड जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लालपरी आणि शिवशाही बसेस नादुरुस्त अवस्थेत पाहायला मिळतात. यामध्ये आतापर्यंत अनेक अपघात देखील झालेत. मात्र, तरी देखील या खराब अवस्थेत असलेल्या बसकडे परिवहन मंडळाचं कसलंही लक्ष दिसत नाहीये. यामध्येच आज पहाटे एक मोठा भीषण अपघात टळला आहे. हा अपघात केवळ चालकाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे.

शिवशाही बसचा टायर अचानक फुटल्याने बसवरील ताबा सुटला. त्यानंतर चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकवली. त्यामुळे बसचा वेग कमी झाला आणि बस जागेवर थांबली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या बसमधील काही प्रवाशांना फक्त किरकोळ इजा झाल्याचं समजते आहे.

 

मात्र, नादुरुस्त गाड्या वापरून परिवहन मंडळ जनतेशी खेळ करत आहे का? असाही प्रश्न सध्या समोर येत आहे. लालपरी बससह शिवशाही देखील नादुरुस्त अवस्थेत पाहायला मिळत आहे. आता परिवहन मंडळाने जनतेच्या जीवाशी न खेळता दुरुस्त गाड्याच जनतेच्या सेवेत लावाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे आजचा अनर्थ हा ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळला. मात्र, यापुढे असं होईलच अशी खात्री नेमकं कोण देणार?, असा सवाल देखील नागरिकांमधून होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *