• Wed. Apr 30th, 2025

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत जिल्हा शोध व बचाव पथकांना प्रगत प्रशिक्षण

Byjantaadmin

Feb 8, 2023

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत जिल्हा शोध व बचाव पथकांना प्रगत प्रशिक्षण

लातूर, (जिमाका) : नागझरी बॅरेज येथे लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (एनडीआरएफ) जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांना प्रगत प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यात 01 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विविध ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून प्रशिक्षण शिबीर आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांसाठी पूर परिस्थिती हाताळण्याबाबतचे प्रगत प्रशिक्षण नागझरी बॅरेज येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्व आवश्यक साहित्य सामुग्री, तंबू, बोटी याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. तसेच शोध मोहीम संचालित करताना संभाव्य चुका टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारीविषयी परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.

शोध व बचाव पथकाच्या सदस्यांचे प्रश्न, शंकाचे निरसनही एनडीआरएफच्या पथकाने केले. जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिपूर्ण करण्यासाठी, तसेच शोध व बचाव पथक अधिक क्षमतेने कार्यरत होण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत यापूर्वी नवीन बोटी वितरीत करण्यात आल्या असून त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील पथकाचे निरीक्षक प्रमोद राय, उपनिरीक्षक बिभीषण मोरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, उदगीरचे अग्निशमन अधिकारी विशाल आलटे, विद्यापीठ उपकेंद्राचे प्रा. डॉ. प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा येथील अग्निशमन विभागाचे पथक, त्याचबरोबर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलिसांचे एकवीस सदस्यीय पथक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *