• Wed. Apr 30th, 2025

ठाकरेंना दिलासा! शिंदे गटाला धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Byjantaadmin

Feb 7, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या  गटाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर  केलेल्या दाव्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मागील आठवड्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच निकाल देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाने केलेली मागणी

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी निकाल देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये असा युक्तीवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडला होता मुद्दा. सुप्रीम कोर्टाने वेगळा निकाल दिल्यानंतर काय असा प्रश्न ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसमोर उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच निकाल देणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 14 फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहणार

केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देणं शक्य होणार का यासंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटातील युक्तीवादादरम्यान चर्चा झाली. याच सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने युक्तीवादादरम्यान केलेली मागणी निवडणूक आयोग मान्य करणार असल्याची दाट शक्यता आहे. ही मागणी मान्य झाल्यास निवडणूक आयोग सध्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्यास प्राधान्य देईल, असं चित्र दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *