• Wed. Apr 30th, 2025

मराठवाडा रेल्वे प्रकल्पातून वंदे भारत रेल्वेच्या 120 युनिटची निर्मिती होणार-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Feb 6, 2023

मराठवाडा रेल्वे प्रकल्पातून वंदे भारत रेल्वेच्या 120 युनिटची निर्मिती होणार-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

20 हजार कोटी पेक्षा अधिक गुंतवणूकींने रोजगारनिर्मितीची मोठी संधी

लातूर/प्रतिनिधी ः- केवळ लातूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी लातूर येथे सुरु होणारा मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन 220 वंदे भारत रेल्वेची घोषणा करण्यात आलेली आहे. यापैकी 120 वंदे भारत रेल्वेच्या युनिटची निर्मिती लातूर येथील मराठवाडा रेल्वे प्रकल्पातून होणार असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून 20 हजार कोटी पेक्षा अधिकची गुंतवणूक होत असल्याने रोजगार निर्मितीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सदर प्रकल्प लातूरला दिल्याबद्दल आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला दिशा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. निलंगेकर यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा प्रकल्प लातूर येथे मंजूर करून त्याच्या उभारणीला गती देण्याचे काम झालेले आहे. आता हा प्रकल्प पुर्णत्वास जात असून याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यामध्ये नवीन 220 वंदे भारत रेल्वेची घोषणा करण्यात आली. यापैकी 120 वंदे भारत रेल्वेंच्या युनिटची निर्मिती लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. त्याअनुषंगानेच या प्रकल्पाची पाहणी आ. निलंगेकर यांनी करून याबाबतची संपुर्ण माहिती घेत प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्यात आलेले असून लवलकरच काम पुर्ण होणार असल्याची माहिती कोच प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी आ. निलंगेकरांना दिली.
मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून वंदे भारत रेल्वेच्या 120 युनिटची निर्मिती होणार असल्याने लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील विकासाला आता अधिक गती प्राप्त होऊन औद्योगिक विकासामुळे वेगवेगळ्या क्षेत्राचाही विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आ. निलंगेकर यांनी स्पष्ट केले. या कोच प्रकल्पाच्या माध्यमातून 20 हजार कोटीपेक्षा अधिकची गुंतवणूक होत असल्याचे सांगत या प्रकल्पाशी निगडीत असलेले इतर उत्पादनाचे युनिटस सुरु होणार असल्याचे आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. या गुंतवणूकीमुळे केवळ लातूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठवाड्यात प्रथमच केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प मंजूर होण्यासह तो पुर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याबद्दल त्यांचेही आ. निलंगेकर यांनी लातूर जिल्हावासियांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) नंतर लातूर हे मराठवाड्यातील मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून आपली ओळख निर्माण करेल आणि या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या अर्थकारणालाही अधिक बळकटी निर्माण होईल असा विश्वास माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी कोच प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता एस.एस. साळवे, अभियंता योगेश तोडकरी, स्वप्नील तांबे, अंगद आचार्य आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed