• Tue. Apr 29th, 2025

भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक नेतृत्व महाराष्ट्राने दिले -डॉ. उमेश बगाडे

Byjantaadmin

Oct 3, 2022

भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक नेतृत्व महाराष्ट्राने दिले
-डॉ. उमेश बगाडे
निलंगा:-देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्याची जाणीव समाजात निर्माण करण्याचे काम समाजसुधारकांनी केले. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी उद्देश मात्र एक होता तो म्हणजे ‘स्वातंत्र्य’. महात्मा फुले, बाळ गंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही स्वातंत्र्य लढ्यातील वैचारीक परंपरा महाराष्ट्रातील आहे. गांधीवाद विकसीत करण्यातही महाराष्ट्राचेच मोठे योगदान आहे. म्हणून विचारांचे नेतृत्व देशाला महाराष्ट्रानेच दिलेले आहे. असे मत औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रोफेसर, डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतिहास विभागाच्या वतीने आयोजित ‘भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद,(ICSSR )नवी दिल्ली द्वारा पुरस्कृत “भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीज भाषणात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की धर्माने ज्या अमानुष रुढी निर्माण केल्या, लादल्या त्यापासून मुक्ती मिळवणे, स्वातंत्र्य मिळवणे हे स्वातंत्र्य समाज सुधारकांनी पेरले. स्वातंत्र्याच्या पाठीमागे नैतिक तत्त्वज्ञान असावे असेही ते म्हणाले. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या उद्घाटकीय मनोगतातून टिळक, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानावर भाष्य केले तसेच हैदराबाद मुक्ती लढ्यातील क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानावरही विवेचन केले. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव मा. बब्रुवानजी सरतापे उपस्थित होते. चर्चासत्रासाठी साधनव्यक्ती म्हणून उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. इंदिरा सुर्यवंशी, हैदराबाद येथील पुराभिलेख व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक मा. भुजंग बोबडे, औरंगाबाद येथील डॉ. गीतांजली बोराडे, परभणी येथील शारदा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नितीन बावळे, यशवंत महाविद्यालय नांदेड येथील डॉ. शिवराज बोकडे, बहीर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत येथील प्राध्यापक डॉ.रामभाऊ मुटकुळे, लातूर येथील डॉ.सदाशिव दंदे इत्यादिंनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान या विषयावर सविस्तर अशी चर्चा केली.
या चर्चासत्राच्या समारोप समारंभात प्रमूख पाहूणे म्हणून मार्गदर्शन करताना लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटनांवर प्रकाश टाकून त्या आपण सकारात्मक पद्धतीने समजावून घेतल्या पाहीजेत असे आवाहन आपल्या मार्गदर्शनातून केले. या चर्चासत्रास संयोजक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भागवत पौळ, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे समन्वयक मा. दिलीप धुमाळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.प्रशांत गायकवाड, माजी इतिहास विभागप्रमुख सांगवे एम. पी. तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक संशोधक,मार्गदर्शक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती चर्चासत्रात होती. महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आलेख प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी आपल्या भुमिकेत मांडला, तर चर्चासत्राच्या पाठीमागील भूमिका संयोजन सचीव डॉ. सुभाष बेंजलवार यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अजित मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर व डॉ. ज्ञानेश्वर चौधरी व डॉ. हंसराज भोसले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चर्चासत्राचे सहसमन्वयक डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed