इतिहासातील तुटलेले धागे जोडण्याचे काम संशोधकांनी करावे-डॉ. सोमनाथ रोडे
निलंगा:-इतिहासातील संशयाचे भूत दूर करण्यासाठी अभ्यासकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रयत्नातूनच वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर येईल. इतिहासात बऱ्याचश्या नोंदी सुटून गेलेल्या आहेत, बरेचसे धागे तुटलेले आहेत, अशा इतिहासातील तुटलेल्या धाग्यांना जोडण्याचे काम संशोधकांनी करावे असे मत ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान” या विषयावर आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे यावर आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, १९३५ ते १९४७ या कालखंडात देशाची राजधानी सेवाग्राम (वर्धा) होती. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण,सर्व सूत्र महात्मा गांधींच्या सेवाग्राम मधून हलत होती. यावरून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राची भूमिका किती महत्त्वाची होती हे लक्षात येते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके होते. विचार मंचावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक मा. दिलीप धुमाळ, माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. मनोहर सांगवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेश पिनमकर यांनी केले. दिवसभरात झालेल्या विविध सत्रांचा लेखा-जोखा प्रस्ताविकातून डॉ. भास्कर गायकवाड यांनी मांडला, तर या चर्चासत्रासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित असलेल्या आणि चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी मानले.