बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने शनिवारी सकाळी आपापले उमेदवार जाहीर केले. भाजपकडून कसबा पेठे येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.
अशी होणार लढत
कसबा पेठ मतदार संघातून मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र, कर्करोगाशी झुंजताना त्यांचे निधन झाले. तर चिंचवडमधली जागा लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त जागी होती. आता या दोन्ही जागेवर भाजपने उमेदवार दिले आहेत. कसबा पेठमधून हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले आहे.त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. या ठिकाणी राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मंगळवारपर्यंत अर्ज स्वीकारणार
पुणे जिल्ह्यात 205 – चिंचवड आणि 215 – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाने सुरू केला आहे. त्यानुसार मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होणार, याची उत्सुकता आहे. या ठिकाणी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे कोणी बंडखोरी करणार का, हे पाहावे लागेल.