लातूर: लातूरहून कळंबला निघालेल्या बसच्या वाहकाला दारु पिण्याची तल्लफ आली. त्यानंतर त्यानं प्रवाशांनी खचाखच भरलेली गाडी बाजूला लावली आणि दारूच्या गुत्त्यावर निघून गेला. प्रवासी मात्र तब्बल दोन तास ताटकळत बसले. अखेर प्रवाशांनी दारूच्या गुत्त्यावर जाऊन वाहकाची गचांडी धरली आणि बस पुढे निघाली. ही घटना घडली लातूरपासून जवळच असलेल्या काटगाव येथे घडली.
कळंब आगाराची एम.एच. ११ बी.एल. ९३४८ या क्रमांकाची एसटी बस ५० प्रवासी घेऊन लातूरहून सकाळी सव्वा नऊ वाजता कळंबला निघाली. ही बस लातूरपासून जवळच असलेल्या काटगाव येथे आली. वाहकानं चालकाला बस रस्त्याच्या कडेला घ्यायला लावली. बस थांबताच वाहक गाडीतून उतरला आणि कोणालाही काही न सांगता थेट बस स्थानकापासून थोडं दूर असलेल्या दारूच्या गुत्त्यावर गेला. तब्बल दीड तास झाला तरी तो परतला नाही. बसमधील प्रवासी वाट पाहून कंटाळले. चालकदेखील कंटाळून गेला. पण करणार काय? वाहक आल्याशिवाय त्याला बस पुढे नेता येईना. तिकीट काढल्यानं प्रवाशी हतबल झाले. पण वाट तरी किती पाहायची? काही प्रवासी बसमधून उतरून दुसऱ्या वाहनानं जाऊ लागले. मात्र वाहक काही येईना.
अखेर प्रवाशांनी बसमधून उतरून ग्रामस्थांकडे विचारपूस केली. तेव्हा कुठं वाहकाचा प्रताप कळला. हा वाहक गेल्या तीन दिवसांपासून अशाच प्रकारे बस साईडला लावून जवळच्या दारूच्या गुत्त्यावर दारू प्यायला जात असल्याचं प्रवाशांना समजलं आणि त्यांचा संताप अनावर झाला.
ग्रामस्थांच्या मदतीनं प्रवाशी थेट दारूच्या गुत्त्यावर पोहोचले. वाहकाला जाब विचारताच, ‘माझ्या फोनची बॅटरी उतरली म्हणून आलो चार्ज करायला,’ असं सांगू लागला. संतापलेल्या प्रवाशांनी त्याची गचांडी धरली आणि बसकडे आणले. तेव्हा कुठे चालकाने बस पुढे नेली. बेवड्या वाहकामुळे प्रवाशांना तब्बल दोन ते अडीच तास उशीर झाला. तर काही प्रवाशांना तिकीट काढूनही दुसऱ्या वाहनाने जावे लागल्यानं आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.