• Tue. Apr 29th, 2025

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना दर महिन्यात रोजगाराची संधी

Byjantaadmin

Feb 2, 2023

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना दर महिन्यात रोजगाराची संधी

• ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन
• 8 फेब्रुवारी रोजी पहिली मोहीम

लातूर, दि. 02 (जिमाका) : नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिली मोहिम 08 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘जागेवरच निवड संधी’ मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विविध पदांसाठी वेगवेगळया पात्रतेच्या उमेदवारांच्या तात्काळ नोकरभरतीची गरज असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

या मेळाव्यामध्ये लातूर मधील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कं.लि.मध्ये फायनान्शियल कन्सल्टंटच्या 30 जागा, एमएस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रा. लि.मध्ये विविध 38 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए, बी.ई सिव्हील, सिव्हील डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार, 08 फेब्रूवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयासमोर, लातूर, येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा बायोडाटा, रिझ्युम, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed