शेतकऱ्याचा पिकविमा तात्काळ मिळावा
निलंगा – लातूर जिल्ह्यातील त्यातच निलंगा, औसा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पिकविमा अध्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, पिक विमा तात्काळ मिळावा अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व विमाकंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना दिला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे सोयाबीनचे पीक हातून गेलेले असून शेतकऱ्यांनी व्याजाने काढून रब्बीची पेरणी केली असून शेतकरी हा कंगाल झाला आहे. निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले असता 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसान कळवणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळवलेले आहे. व विमा कंपनीने पंचनामा केलेला आहे. पंचनामा केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडणे बंधनकारक आहे पण पंचनामा करून दोन महिने उलटून गेले असताना सुद्धा अद्याप पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत. नियम फक्त शेतकऱ्यांनाच बंधनकारक आहेत का? विमा कंपनीने मनमानी कारभार करून सुद्धा विमा कंपनीला कोणी जबाबदार धरत नाही का? असा आम्हा सर्व शेतकऱ्यांचा थेट आरोप आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान झालेल्या प्रमाणात पैसे मिळाले नाहीत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामा करताना एकाच गावात समप्रमाणात पाऊस पडला असताना सुद्धा नुकसानीची टक्केवारी वेगवेगळी कशी दाखवली आहे? हे गोड बंगाल काय? विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्याकडून पैसे घेऊन टक्केवारी वेगवेगळी लागली आहे काय? असा शेतकऱ्याचा थेट आरोप आहे. खरीप 2022 चा ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनीने लातूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्याकडून पिकविमा भरून घेतला आहे. त्याचे पंचनामे सुद्धा करण्यात आलेले असून विमा कंपनीच्या नियमानुसार पंचनामा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडणे बंधनकारक असताना, विमा कंपनीने जाणून बुजून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नाहीत.याबद्दल विमा कंपनीवर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना पिकविमा तात्काळ वर्ग करावा अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला. विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी सोयाबीन काढणी पश्चात जोखीमअंतर्गत पात्र नुकसान भरपाई रक्कम रुपये 19.94 कोटी रक्कम विमा हप्ता अनुदान प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसात शेतकऱ्याचे बँक खात्यावर वर्ग होईल तसेच उर्वरित शेतकऱ्यांची स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पात्र नुकसान भरपाई रक्कम मंजुरी आधीन असून 10 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल असे पत्र देण्यात आले. निवेदन देताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, मनोज शिंदे, सन्मुख बरदाळे,रमेश धुमाळ,संतोष धुमाळ,युसुफ शेख, बालाजी मिरगाळे, लाईकपाशा शेख, इकबाल पटेल इत्यादी उपस्थित होते.