लातूर/प्रतिनिधी:प्रजासत्ताक दिन तसेच भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक स्पर्धामध्ये शहरातील शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत देशिकेंद्र विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, गोदावरी देवी कन्या विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, सोमानी माध्यमिक विद्यालय, विद्या विकास माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय,मनपा शाळा क्रमांक ९ , युनिक डान्स अँड फिटनेस क्लब, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन आदी शाळातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात सहभागी सर्वाना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले.मनपाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.