• Wed. Apr 30th, 2025

उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Byjantaadmin

Jan 28, 2023

सांगली, , (जि. मा. का.) : इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पेठ नाका ते सांगली या 41.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. आष्टा शहर येथे झालेल्या या कार्यक्रमास कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मनसिंग नाईक, आमदार  विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले,  इंधन म्हणून इथेनॉलची मागणी वाढत आहे, यासाठी उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्याबरोबरच शेतकरी सभासदांना होणार आहे. केंद्र सरकारने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता  हार्वेस्टिंग सारखी योजना आणली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेमुळे कमी वेळेत ऊस कारखान्यास जातील आणि उसाचा उतारा चांगला मिळेल असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले. इथेनॉल बरोबरच हायड्रोजन हे देखील भविष्यातील इंधन असून या इंधनाच्या निर्मितीसाठीही शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. हायड्रोजन इंधन निर्मितीतून शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवले पाहिजे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र हायड्रोजन निर्मितीचेचे हब होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. गडकरी म्हणाले, पेठ सांगली या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरु होणार आहे  बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार असल्याने हा रस्ता अधिक दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होईल व  या भागातील विकास झपाट्याने होईल. या रस्त्यावरून होणारा प्रवास आनंददायी होण्यासाठी या भागातील शैक्षणिक संस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पालकमंत्री डॉ.खाडे म्हणाले,पेठ – सांगली या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि  ह्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होत असल्याने जिल्हावासियांची  बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन  या भागातील विकासाला गती दिली त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.  मार्च नंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होवून चांगला व दर्जेदार रस्ता  होईल याची मला खात्री आहे असेही पालकमंत्री डॉ. खाडे  म्हणाले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले या रस्त्याची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे, याचे सारे श्रेय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानाच द्यावे लागेल. हा रस्ता शिराळा मार्गे कोकणाला जोडल्यास त्याचा लाभ कोकणातील व या भागाच्या विकासाला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने या परिसराचा विकास झपाट्याने होईल.

पेठ-सांगली हा  रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या भागात विकासाचे दालन खुले झाले आहे असे खासदार संजय पाटील यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक करून या रस्त्याच्या कामाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed