• Wed. Apr 30th, 2025

‘पठाण’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी 55 कोटींचा गल्ला:जगभरात 100 कोटींहून अधिक कलेक्शन

Byjantaadmin

Jan 26, 2023

शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पठाण’ या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. ‘पठाण’ हा बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हृतिक रोशनच्या ‘वॉर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.6 कोटींचे कलेक्शन केले होते.

250 कोटींच्या बजेटमध्ये पठाणची निर्मिती करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी भारतातील कमाईचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ रिलीजपूर्वी बराच वादात सापडला होता. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याविरोधात देशातील अनेक ठिकाणी निदर्शने झाली. गाण्यातील दीपिकाच्या पेहरावावर आंदोलकांनी आक्षेप घेतला.

सर्वात मोठा ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला
‘पठाण’ने इतिहास रचत नवा विक्रम केला आहे. 56 कोटींच्या कलेक्शनसह हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने KGF Chapter 2 च्या हिंदी व्हर्जनला मागे टाकले आहे.

KGF Chapter 2 चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 53.95 कोटी होते. या यादीत 51.6 कोटींच्या कमाईसह हृतिक रोशनचा ‘वॉर’ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ओपनिंग डेला 300 स्क्रीन्स वाढवल्या
सिनेविश्लेषक तरण आदर्श यांच्या मते पठाण वर्ल्डवाइड 8000 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलुगूसह 5500 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. त्याचबरोबर या चित्रपटाला परदेशात 2500 स्क्रीन्स मिळाल्या आहेत.

सुरुवातीला हा चित्रपट 5200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र चित्रपटाची क्रेझ पाहता आणखी 300 स्क्रीन्स वाढवण्यात आल्या आहेत. ‘पठाण’च्या रिलीजसह कोविड दरम्यान बंद झालेल्या 25 सिंगल स्क्रीन पुन्हा सुरू करण्यात आल्या. याबाबतची माहिती शाहरुखने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरून दिली.

शाहरुख चार वर्षांनी परतला
शाहरुख चार वर्षांनंतर ‘पठाण’सोबत रुपेरी पडद्यावर परतला. तो शेवटचा 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चार वर्षांत त्याने ‘ब्रह्मास्त्र’, ‘लाल सिंग चढ्ढा’ आणि ‘रॉकेट्री’सारख्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed