• Wed. Apr 30th, 2025

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करूया -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Byjantaadmin

Jan 26, 2023

_लातूर येथे प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा_

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करूया -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

▪️मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
▪️वृक्ष लागवड, नदी संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
▪️विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

*लातूर, दि. 26 (जिमाका):* जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात असलेली तफावत दूर करणे आवश्यक आहे. यासाठी मुलगा-मुलगी समान असल्याची भावना समाजात रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते.

मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबाराव मनोहरे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्यासह स्वातंत्र्यसेनानी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लातूर जिल्हा विविध सामाजिक चळवळी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, वृक्षाच्छदनामध्ये लातूर जिल्हा खूप मागे आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने ही बाब गंभीर असून जनतेने अधिक जागरूकपणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ही एक लोक चळवळ बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. तसेच नद्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात मांजरा नदीच्या काठावरील गावांमध्ये ‘चला जाणूया नदीला अभियान’ अंतर्गत मांजरा नदी जलसंवाद यात्रा काढण्यात आली. या जलसंवाद यात्रेतून नदीचे मानवी जीवनातील महत्व आणि तिचे आरोग्य सुधारण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. नदीसंवर्धनाच्या चळवळीतही आपण सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

*पथसंचालनात विविध पथके, चित्ररथांचा सहभाग*

ध्वजारोहणानंतर झालेल्या परेड संचालनात पोलीस विभाग, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक विद्यालय, सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी, स्काउटस आणि गाईडस सहभागी झाले होते. तसेच यावेळी पोलीस विभागाचे श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दलाचे वाहन, अग्निशमन दल, आरोग्य विभागाची रुग्णवाहिकेसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, समग्र शिक्षा अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे चित्ररथ पथसंचालनालयात सहभागी झाले होते.

*वीरपत्नी, पुरस्कारप्राप्त अधिकारी, विद्यार्थ्यांचा सन्मान*

लडाख येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले वीर जवान गणपती लांडगे यांच्या पत्नी श्रीमती अनिता लांडगे यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते शाल आणि ताम्रपट देवून गौरव करण्यात आला. तसेच गडचिरोली येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना, तसेच गोंदिया येथील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांना पोलीस महासंचालक अंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धीबद्दल पोलीस उपनिरीक्षक ए. आर. पवार, पोलीस हवालदार हणमंत कोतवाड, पोलीस नायक विनोद चलवाड, जी. जी. क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला.
23 नोव्हेंबर 2022 रोजी लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात आगीत अडकलेल्या प्रवाशांचा जीव वाचविल्याबद्दल शिरूर ताजबंद येथील अझर बबनसाब शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ लिपिक युवराज गायकवाड, वन अतिक्रमण निष्कासित करणे, नाविन्यपूर्ण योजनेची कामे उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल विभागीय वन अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विवेकानंद हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला. भारत स्काऊटस आणि गाईडसचे विद्यार्थी, गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली लातूरकरांची मने..!

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने कुस्ती आणि जिम्नॅस्टिक्सच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी आणि खेळाडूंनी सादर केलेल्या मैदानी खेळांच्या प्रत्याक्षिकांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये सहभागी खेळाडू, विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed