26 फेब्रुवारीरोजी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. चिंचवड मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेने लढवावी, अशी आमची इच्छा असल्याचे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
तर, कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हे दोन पक्ष निर्णय घेतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यात या पोटनिवडणुकीसंदर्भात सर्व अंतिम निर्णय घेतले जातील, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर
संजय राऊत म्हणाले की, पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी, असे आमचे मत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा शिवसेनेने लढावी, अशी आमची इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
तर, कसबा पोटनिवडणुकीत मविआमधून कोणत्या पक्षाने निवडणूक लढवायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निर्णय घेतली, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले की, कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढायला हरकत नाही, असा मविआच्या नेत्यांचा सूर आहे. महाविकास आघाडी निवडणुकीतून दूर राहिली तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक होईल.