• Wed. Apr 30th, 2025

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्याची जबाबदारी अजित पवारांवर? शरद पवारांचं महत्त्वपूर्ण भाष्य

Byjantaadmin

Jan 23, 2023
The Union Minister for Agriculture and Food Processing Industries, Shri Sharad Pawar addressing at the launch of the Sahana Group’s New Marathi Chanel “Jai Maharashtra”, in Mumbai on April 27, 2013.

बारामती: शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीतील सातत्याने सुरु असलेल्या राजकीय संघर्षामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला रिंगणार उतरवणार, महाविकास आघाडी या निवडणुकीत एकदिलाने लढणार का, याची जोरदार चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. रविवारी बारामती येथील कृषी प्रदर्शनात आले असताना शरद पवार यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीविषयी तुम्ही अजित पवार यांना विचारा. मला राजकीय प्रश्न विचारू नका. त्यांच्या या वक्तव्यावरुन ही पोटनिवडणूक जिंकण्याची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. या दोन पोटनिवडणुकांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संभाव्य युतीसंदर्भातही विचारण्यात आले. मला यासंबंधी काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असे पवार यांनी म्हटले.

कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहिले होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबीयांवर स्तुतीसुमने उधळली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मश्री अप्पासाहेब पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार ते आमदार रोहित पवार हे सगळे पवार चांगले आहेत. त्यांची पॉवर अशीच वाढत राहो, अशी प्रार्थना केली होती. रविवारी पवार यांना सत्तार यांनी केलेल्या कौतुकाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, मी त्याला फार काही महत्त्व देत नाही. मी महत्त्व देऊ इच्छित नाही.

विजयसिंह मोहित पाटील पवारांसोबत कृषी प्रदर्शनाला

राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपवासी झालेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत इलेक्ट्रीक कारमधून बारामतीत आयोजित कृषिक प्रदर्शनाची पाहणी केली. पारनेरचे आमदार निलेश लंके हे ही त्यांच्यासोबत होते. मोहिते पाटील हे मोठ्या कालखंडानंतर पवारांसोबत दिसल्याने त्याची प्रदर्शनामध्ये चर्चा झाली. मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते समजले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील हे पवारांसोबत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात ते पक्षापासून दुरावले गेले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. रविवारी त्यांनी पवारांसोबत कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यासंबंधी पवार म्हणाले, विजयदादा यांना कृषी क्षेत्राबद्दल आस्था आहे. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी कृषिक प्रदर्शनाला भेट दिली आहे.

आज महाविकास आघाडीची बैठक

कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेसने उच्छुक उमेदवारांची चाचपणीही केली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची यासंदर्भात बैठकही झाली. विशेष म्हणजे या बैठकीला इच्छुकांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचीही आज बैठक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *