भारतातील काही निवडक शहरांमध्ये आजपासून 5G सेवा सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित प्रदर्शनात केले. त्यामुळे आजपासून देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे.
आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञानाचे व्यासपीठ असणारी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या १३ शहरांना प्रथम वापरता येणार 5G सेवा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ झाला असून देशातील १३ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध झाली आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात वैष्णव यांनी 5G सेवांसंदर्भात माहिती दिली होती. “5G चा प्रवास खूप बदल घेऊन येणार आहे. अनेक देशांना ४० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागली. पण भारतात कमीत कमी वेळात ८० टक्के देशवासियांना 5G ची जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच ही सेवा परवडणारी आहे. याची खात्री करू आणि उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रीत करू”, असेही त्यांनी म्हटले होते.