आज
१ ऑक्टोबर
जागतिक कॉफी दिवस
थकवा आल्यानंतर फ्रेशनेस आणण्यासाठी असो, वा मिटिंग मध्ये दीर्घ काळ चर्चा करणे असो, कॉफीचा कप सोबतीला असतोच. कॉफीचे महत्त्व आता वाढते आहे.
कॉफी हे पूर्वी पासूनच बैठकीसाठीचे पेय मानले जाते. एखाद्या व्यक्ती सोबत चर्चा करण्यासाठी ‘चल कॉफी साठी भेटू’ असे सहजच म्हटले जाते. यामुळेच आधी पासूच कॉफी ही चहापेक्षा महाग आहे. हॉटेल, रेस्टॉरेंट मध्ये याआधी तयार कॉफी १० ते २० रुपयांना मिळत होती. पण आता कॉफीचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामुळे साधी कॉफी देखील किमान ७५ रुपये तर मोठ्या हॉटेल्स मध्ये ती १०० ते १२० रुपयांची असते. मोठ्या हॉटेल्स मध्ये एखाद्या सोबत बसून कॉफी पिणे ही शान मानली जाते.
भारतात कॉफी एका हाज यात्रेकरुनेच आणली. त्याचे नाव होते हाजी बाबा बुदान. हा १६०० सालच्या आसपास (म्हणजे शिवाजी महाराज च्याआधी) चिकमंगळूरला आला व तेथील जंगलात एक झोपडे बांधून राहू लागला. त्याच झोपडीच्या बाहेर त्याने स्वत:च्या वापरासाठी काही कॉफीच्या बिया पेरल्या. त्याला कल्पना नव्हती की या बिया भारतात एका फार मोठ्या उद्योगाला जन्म देणार आहेत. त्याने लावलेली झाडे एका ब्रिटिश माणसाने शोधून काढली.
आज भारतात जी काही कॉफीची झाडे आहेत त्यातील जवळजवळ ६०-७० टक्के तरी या झाडांची बाळे आहेत. बाबा बुदान हे आता त्या भागात एक मोठ्ठे प्रस्थ झाले आहे. ब्रिटिशांनी १८४० साली भारतात कॉफीची शास्त्रशुद्ध लागवड करण्यास प्रारंभ केला.
इकडे बाबा बुदाननी कॉफीच्या बीया भारतात पेरल्या त्याच काळात डच, जर्मन व इटालियन प्रवाशांनी लेव्हांटहून या अप्रतिम पेयाची माहीती आपल्या वनस्पती शास्त्रज्ञांना पुरवली. लेव्हांट म्हणजे आत्ताचे सिरिया. १६१४ साली डच व्यापाऱ्यांनी कॉफीच्या लागवडीचे प्रयत्न करायचे ठरवले आणि त्यांनी एक रोप येमेन मधील लाल समुद्रावरील एक बंदर, मोचाहून, हॉलंडला नेण्यात यशही मिळवले. त्या काळात व आत्ताही हे बंदर कॉफीच्या व्यापाराचे एक प्रमुख केंद्र आहे.
बऱ्याच कॉफीखान्यांचे नाव मोचा का असते याचे उत्तर याच्यात आहे. (इंग्लिश- मोका, स्पॅनिश- मोचा, अरेबीक- मोचा) त्या काळात श्रीलंका ही डचांची वसाहत असल्यामुळे त्यांनी याची लागवड तेथे केली. खरेतर अरबांनी सिलोन मधे कॉफी १५०५ सालीच आणली होती. डचांनी मात्र कॉफीची व्यापारी दृष्टीकोनातून लागवडीचा प्रयत्न चालू केला.
१६७० साली फ्रेंचांनी युरोप मधे कॉफी लावायचा प्रयत्न केला पण तो फसला. १६९६ साली डचांनी मलबार येथून त्यांच्या जावाच्या वसाहतीत कॉफीची रोपे पाठविली ती त्या बेटांवरची पहिली रोपे. ही रोपे ‘कॉफी अरेबिका’ या जातीची होती व ती मलबार येथे कननूर येथे थेट अरेबियातून आणण्यात आली होती. या रोपांनी मात्र जावाच्या बेटांवर मूळ धरले. हीच जात पुढे इंडोनेशिया, सुमात्रा इ. बेटांवर पसरली.
१७०६ साली जावा मधून कॉफीची रोपे ॲम्स्टरडॅम येथे आणण्यात आली. तेथील रोपवाटिके मधून ही रोपे सामान्य जनतेत वितरीत करण्यात आली. डच त्यांच्या वसाहती मधे कॉफीची लागवड करत असताना फ्रेंच वसाहतीत लागवड करण्यासाठी काही रोपांची रवानगी फ्रान्स मधे करण्यात आली, पण त्या रोपांनी तेथे तग धरला नाही.
१७१४ साली मात्र फ्रेंच सरकारने ॲम्स्टरडॅमच्या नगरपालिके बरोबर झालेल्या एका करारानुसार एक तरुण, जोम धरलेले कॉफीचे रोप फ्रान्सच्या राजाला मार्ले येथे पाठविले. तेथे राजाच्या प्रतिनिधीने, जार्डीन रोपवाटिकेत अँटोनी जुसॉं नावाच्या प्राध्यापकाने स्वीकारले.
फ्रेंचांच्या दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका व मेक्सिको या वसाहती मधे याच रोपांची लागवड करण्यात आली. त्या काळात व्यापारी कॉफीची लागवड ही उत्तम उत्पन्न देण्याचा व्यवसाय म्हणून त्यासाठी जीव टाकत होते. त्या व्यापारातून चांगला कर मिळे म्हणून देश त्याच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील होते.
कॉफी दिवसाच्या कॉफी प्रेमींना शुभेच्छा !
संकलन व संकल्पना
मौजन ए आर
साभार
नेट