• Mon. Apr 28th, 2025

भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हाती नाही पण भूकंपरोधक घरं बांधणे आपल्या हाती -मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव,प्रवीणसिंह परदेशी

Byjantaadmin

Oct 1, 2022

भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हाती नाही पण
भूकंपरोधक घरं बांधणे आपल्या हाती
-मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव,प्रवीणसिंह परदेशी

लातूर(जिमाका):- भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हातात नाही, परंतु यापासून बचाव करण्यासाठी मात्र प्रयत्न करु शकतो. त्यासाठी योग्य प्रशिक्षण तसेच आपण बांधत असलेले घरे, इमारती भूकंपरोधक बांधणे आवश्यक असल्याचे मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव तथा लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.
औसा व निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ व ब वर्गवारीच्या गावातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना करण्यासाठी किल्लारी येथील निळकंठेश्वर देवस्थान, सभागृहात मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत भूकंप पुनर्वसित अ व ब वर्गवारीच्या गावातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात समाधान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रलयकारी भूकंपात मृत्यू पावलेल्या नागरिकांना दोन मिनिटांचे मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली.
यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन वाघमारे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख,नागरिकांचीही यावेळी उपस्थिती होती.
प्रवीणसिंह परदेशी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 30 सप्टेंबर, 1993 रोजी जेंव्हा भूकंपाचा प्रलय आला, त्यानंतर अनेक प्रश्न होती. यातूनही किल्लारीकर मोठ्या उमेदीने पुढे आले . या प्रलयामुळे अनेक मुले अनाथ झाली. त्या आनाथांच्या पालकांच्या जमिनी ते मुलं मोठी होईपर्यंत सुरक्षित ठेवणंही तेवढंच महत्वाचं होतं. ते काम जिल्हा प्रशासनाने उत्तमपणे केले आहे.
आ.अभिमन्यु पवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की, दिनांक 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबार, 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवाडा राबविला जात आहे. या पंधरवाडानिमित्त शेवटच्या माणसांला शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. शेतातल्या शेवटच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला गोगलगायीच्या प्रादुर्भावाने ग्रासले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु शासानाने यासाठी शासन निर्णय पारित करुन त्यांना मदतही जाहीर केल्याचे सांगून शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. किल्लारी भूकंपग्रस्त गावांच्या सर्वांगीण विकासासाठी “किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम” राबविण्यात यावा अशी विनंती मी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली असून त्यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आ. पवार यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की, समाधान शिबीराचे आयोजन किल्लारीकरांच्या सेवेत विविध विभागाच्या सहकार्याने स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून आपणआधार सिडींग तसेच विविध योजनांची माहिती यासोबत नोंदणीही करुन घेण्याचे आवाहन केले.
तसेच विशेष लक्ष देवून किल्लारीकरांना कबाले वाटपाची कार्यवाही सुरु आहे. कांही प्रलंबित प्रकरणे ही जिल्हास्तरावर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे. तर कांही प्रलंबित प्रकरणांवर मंत्रालयीन स्तरावरुन मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियानात काही नविन व लोकाभिमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ तात्काळ लाभ देता येतो, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे म्हणाले की, सन 1993 च्या भूकंपाच्या कालावधीत ज्या अधिकाऱ्यांनी कामं केली ती अत्यंत उल्लेखानिय अशीच होती.
या समाधान शिबीराच्या माध्यमातून त्या-त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असून नागरिकांची निवेदने, शंकाचे निरसनही करण्यात येणार आहे.
सेवा पंधरवडाअंतर्गत भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वाटप, जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र वाटप, उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप, शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
लाभार्थ्यांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वाटप
किल्लारी येथील कांबळे बाबू संभाजी , लामजना येथील शंकर बिरु बनसोडे, श्रीमती कलावती धोंडीराम चिल्ले, तपसे चिंचोली येथील श्रीमती अंबुबाई गणपती भिसे,जवळगा पो. येथील श्रीमती प्रभावती किसन मुळे, वांगजी येथील गंगाबाई माणिकराव बिराजदार यांना सेवा पंधरवाडानिमित्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

*जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र वाटप*
समानधान शिबीरामध्ये किल्लारी येथील पवार शिवकुमार व्यंकट, श्रीमती सोनटक्के पुजा कमलाकर, कुमठा येथील कांबळे प्रतीक प्रताप या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
*लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप*
किल्लारी येथील महादेव गोपाळ पवार यांना रहिवाशी प्रमाणपत्र व माधव दिगंगर नागणे, श्रीमती महादेवी दत्तात्रय पळसे, श्रीमती जयश्री अभिमन्यु कांबळे, श्रीमती वंदना आनंद गायकवाड, श्रीमती सुमन दिलीप चव्हाण या लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मोगरगा येथील रुब्दे अभिषेक विजय यांना वय व अधिवास प्रमाणपत्र , तर किल्लारी येथील कुलकर्णी घनश्याम रामराव यांना आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
*लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप*
येळवट येथील लाभार्थी श्रीमती गायकवाड अनुराधा संतोष , श्रीमती थोरात काशीबाई बळीराम, श्रीमती लाळे सिंधु मारुती, कांबळे पांडूरंग धर्मा, श्रीमती जाधव पर्वता लक्ष्मण, थोरात भागवत बळीराम.
किल्लारी तांडा येथील श्रीमती चवहाण कविता किरण, भालेराव रतन तुळशीराम, गायकवाड शिवाजी विठोबा, गायकवाड किसन गोपीनाथ, खराते सुभाष बाबू, जाधव शहाजी दशरथ, भालेराव एकनाथ माने, खराते नारायण बळी.
किल्लारी येथील श्रीमती पवार सुरेखा सुर्यकांत, श्रीमती शिंगनाळे बेगमबी मुबारक, श्रीमती शेख मदीना अल्लाबक्ष, श्रीमती गिरी निलाबाई भगवान, श्रीमती भोसले मंदाबाई विलास, श्रीमती भोसले वैशाली विक्रम.
संजय गांधी योजनेतंर्गत किल्लारी येथील श्रीमती भोसले शेषाबाई पांडूरंग, मोहिते विठ्ठल मारुती, श्रीमती कुलकर्णी पुष्पाबाई रजनीकांत , श्रीमती मोहिते पंचफुला विठ्ठल, बागवान इसाक बाशु, श्रीमती लिंबाळे लक्ष्मणबाई अरविंद, श्रीमती भारती महानंदा मुरलीधर या लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या-त्या योजनेचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
किल्लारी भूकंपाच्या २९ व्या स्मृतिदिनी सेवा पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव नवी दिल्ली तथा तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते मंगरुळ येथे वृक्षारोपणही करण्यात आले. तळणी, मंगरूळ व गांजनखेडा गावांना भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed