न्यायधीश परीक्षेत मयुरी कदम राज्यात सहावी
निलंगा :-महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाने सन २०२१ मध्ये घेतलेल्या कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश पदाच्या परीक्षेत निलंगा येथील कन्या मयुरी व्यंकटराव कदम हिने पहिल्याच प्रयत्नात १६६ गुण घेऊन राज्याच्या गुणवत्ता यादीत सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल मयुरीचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे. मूळची निलंगा येथील मयुरी कदमचे दहावीपर्यंतचे शिक्षण लातूर येथील श्री केशवराज विद्यालयात तर बारावीपर्यंतचे शिक्षण दयानंद कला महाविद्यालयात झाले. पुढे विधी शाखेचे अर्थाथ एलएलबी पदवीचे शिक्षण पुणे येथील मॉडर्न कॉलेजमधून घेतले. त्यानंतर तिने २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली न्यायधिश पदाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मयुरीने पहिल्याच प्रयत्नात १६६ गुण घेऊन राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. मयुरी निलंगा न्यायालयात वकिली करत परीक्षेच्या माध्यमातून न्यायधीश झालेले व्यंकटराव कदम यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल हंगरगा येथील सरपंच अंबादास जाधव, उपसरपंच विठ्ठल सुर्यवंशी, जनार्दन चव्हाण, राजकुमार सूर्यवंशी सह सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे.