• Wed. Apr 30th, 2025

अनाथांच्या आरक्षणात बदल करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Byjantaadmin

Jan 13, 2023

मुंबई,  : राज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. त्यात सकारात्मक बदल करण्याची गरज असून येत्या काळात अनाथ आरक्षणात बदल करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्पण युवा पुरस्कार प्रदान समारंभात दिली.

चर्चगेट परिसरातील गरवारे क्लब येथे स्वामी विवेकानंद जन्मदिन आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तर्पण फाऊंडेशनद्वारे आयोजित तर्पण युवा पुरस्कार हभप नवनाथ महाराज आणि मयुरी सुषमा यांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासकीय पद्धतीमध्ये अनाथांचे क्षेत्र दुर्लक्षित राहू नये यासाठी राज्य शासनाने अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न उद्भवले होते त्यांचे निराकरण करुन हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने काही बदल करण्याची गरज आहे. येत्या काळात तसे बदल देखील करणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

तर्पण फाऊंडेशनतर्फे १८ वर्षावरील अनाथांना सुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाच्या व्यवस्थेबरोबर काम करण्यासाठी राज्य शासनाने तर्पण फाऊंडेशनसमवेत सामंजस्य करार केला. या मुलामुलींना तर्पण संस्थेकडून आवश्यक सुविधा आणि संस्थात्मक संरक्षण दिले जाते. अशा चांगल्या कामांना पाठबळ दिले पाहिजे. अनाथांसाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन आहे, असेही श्री. फडणवीस यांनी आश्वस्त केले.

महंत भगवानगड न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या अध्यात्मिक व सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला. संत ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्मिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांचा सामाजिक दृष्टिकोनही पाहण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरीमध्ये साहित्य आणि तत्वज्ञ एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. भगवानगडावर शंभर अनाथ मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनाथांसह त्यांच्यासाठी  काम करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत महंत डॅा. शास्त्री यांनी व्यक्त केले. प्रारंभी तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी तर्पण फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून अनाथांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्याबद्दल अनाथ मुलामुलींनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, भूमी वर्ल्डचे संचालक प्रकाश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed