• Wed. Apr 30th, 2025

तब्बल 12 तासांनी मुश्रीफांची चौकशी थांबली, ईडीच्या तपासात काय समोर आलं?

Byjantaadmin

Jan 12, 2023

कोल्हापूर, 12 जानेवारी : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत काहीच निष्पण्ण न झाल्याचे दिसून आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यानंतर कागलच्या गैबी चौकात हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, तपास यंत्रणेला त्यांनी विचारलेली सर्व माहिती दिली आहे. राजकीय अकसापोटी छापा टाकण्यात आलेला आहे. इडी अधिका-यांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आली. सर्वसामान्य जनता जोपर्यंत आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही आमचे काही करू शकत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान ज्यावेळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली त्यावेळी हसन मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याने कागल पोलिसांची धावपळ उडाली होती. मुश्रीफांच्या घरावर छापा पडला असल्याचे समजतात मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर तसेच गैबी चौकात गर्दी केली होती.

पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे छापे टाकून पुन्हा काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने बुधवारी पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून कागदपत्र जप्त करण्यात आली होती. ते प्रकरण सुरू असतानाच आज पुन्हा त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

पुण्यातील दोन ठिकाणच्या मालमत्तांबरोबर कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला असून त्यांच्याही घरातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ईडी ने यापूर्वीही छापेमारी केली होती. त्यात काही मिळाले नसावे म्हणून त्यांनी पुन्हा ही कारवाई केली असावी असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed