मुंबई: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव केसीर (KCR) याचं गुलाबी वादळ महाराष्ट्रात धडकणार आहे. कारण, त्यांचा पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे. 15 जानेवारीला नांदेडमध्ये ही सभा होईल पण, त्याची तयारी 7 जानेवारीपासूनच सुरु होणार आहे.
महाराष्ट्रातील तेलंगाणा सीमाभागातील किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये बैठका होतील. नांदेडनंतर महाराष्ट्रातली दुसरी सभा थेट शिवनेरी किल्ला परिसरात होणार आहे. ओवैसींच्या एमआयएमनंही नांदेडमधूनच महाराष्ट्रात एन्ट्री घेतली होती. एमआयएमचे पुढे त्यांचे आमदार आणि खासदाराही झाले आणि आता त्याच मार्गानं केसीआरही महाराष्ट्रात येत आहेत. त्यासाठी नांदेडमध्ये मोठं कार्यलयंही बूक केले आहे.
यासभेतला सीमावादाचीही पार्श्वभूमी आहे. ज्या पद्धतीनं काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती. केसीआर यांचा पक्ष आधी तेलंगाणा राष्ट्र समिती होता. त्याचंच नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केले आणि राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि ओडिशामध्ये शिरकावाचा प्रयत्न आहे. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते. त्यात कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक प्रभाव दाखवू शकतात.
नांदेडची सभेनंतर केसीआर महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत. त्याचत तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. दलित, ओबीसीसह इतर मागास समाजांवर केसीआर यांच्या पक्षाची मदार आहे. तेलंगाणात हाच मतदार काँग्रेससोबत होता आणि आता तोच मतदार बीआरएससोबत आहे. महाराष्ट्रातही असंच काहीसं होणार का? सभांच्या आड केसीआर यांचा आणखी काही प्लॅन आहे हे लवकरच कळणार आहे.