मुंबई:-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर “मार्ड’ संघटनेच्या सदस्य निवासी डॉक्टरांनी आपला संप दुसऱ्या दिवशी मागे घेतला. महाजन यांनी १,४३२ पदे भरू, निवासी डॉक्टरांची देणी अदा करू व वसतिगृहातील समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे आश्वासन दिले. दुसरीकडे, महावितरण वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महाजनको व महापारेषणमधील खासगीकरणाला विरोधासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार-बुधवार मध्यरात्रीपासून तीन दिवस (७२ तास) संपाची हाक दिली. संपात ३१ संघटनांचे दीड लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाईचा इशारा दिला आहे.
सरकारची तयारी : संपकाळात अखंडित वीजपुरवठ्यासाठी तयारी केली आहे. कंत्राटी कामगार, नििवृत्त अभियंत्यांसोबतच सा. बां., विद्युत निरीक्षक आणि महाऊर्जा विभागातील अभियंत्यांना विविध ठिकाणी नेमले जाणार आहे.