लातुर:-ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यामुळे आता अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या गप्पांचे फड रंगू लागले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. या निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कडे लागले आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांकडून मोर्चे बांधणीस देखील सुरवात केली जात आहे. ग्रामीण भागातून नेतृत्व करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. तालुका पातळीवर नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची संधी दिली जाते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार रिंगणात होते. यात अनेकांना बाजी देखील मारली आहे. त्यामुळे गट आणि गणांची तयारी करणाऱ्यांमध्ये तरुणांचा भरणा अधिक असेल यात शंका नाही. अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात शासनाकडून कुठलीही घोषणा झाली नसली तर इच्छुक मात्र तयारीला लागले आहे.