पानगाव-खरोळा रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल
‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज देशमुख यांचा विश्वास; मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू
लातूर :-रेणापूर तालुक्यातील पानगाव ते खरोळा पाटी (राष्ट्रीय महामार्ग क्र.361H) या रस्त्याच्या कामाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळवून हा विषय तातडीने मार्गी लागावा यासाठी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख हे सरकारकडे गेल्या २ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका असल्याने या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पानगाव ते खरोळा पाटी या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. विविध कारणांमुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ न शकल्याने येथील ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. हे विचारात घेवून या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. सदर रस्त्याची नवीन निविदा स्वीकृती प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ राजमार्ग मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. याला तातडीने मंजुरी मिळण्याबाबत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांना पत्रही पाठवले आहे. त्यामुळे लवकरच हा विषय मार्गी लागेल, अशी आशा आहे.
याआधीही गेल्या २ वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पाठपुरावा केला आहे. श्री. नितीन गडकरी यांना ४ जून २०२१, ६ ऑगस्ट २०२१, २४ नोव्हेंबर २०२१ आणि १८ डिसेंबर २०२१ रोजी रोजी पत्र पाठवून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने सदरील लांबीतील काम संबंधित कंत्राटदाराकडून वगळले जावे, अशी मागणीही मागील वर्षी केली होती. श्री. धिरज देशमुख यांची ही मागणी मान्य करीत सरकारने यांनी जुन्या कंत्राटदाराचे काम मूळ निविदेतून काढून घेण्यास मान्यता दिली.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून श्री. धिरज देशमुख यांनी या रस्त्याचा विषय त्यांच्यासमोर मांडला होता. तसेच, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांचीही भेट घेत या रस्त्याचे काम रखडले असून अतिवृष्टीमुळे हा रस्ता आणखी खराब व वाहतुकीस अडचणीचा ठरला असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी २०२१ मध्ये केली होती. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली. खड्डेही बुजवण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अनेकजण पानगाव येथे दर्शनासाठी येतात. हे विचारात घेऊन श्री. धिरज देशमुख यांनी या २०१९ आणि २०२० मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले होते. रेणापूर तहसील कार्यालयात २५ जुलै २०२२ आणि जिल्हाधिकारी कार्यालयात २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत श्री. धिरज देशमुख यांनी या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला होता. तसेच, पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन यांची ३ नोव्हेंबर २२ रोजी भेट घेवून श्री. धिरज देशमुख यांनी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, असे पत्र त्यांना दिले होते.