सोलापूर: मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणूक लढणार नसलो तरी मी काँग्रेस पक्षात सक्रिय राहीन, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सोलापुरातील काँग्रेस भवनात पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांची देहबोली आणि घोषणेची चांगलीच चर्चा रंगली होती.
सुशीलकुमार शिंदे माध्यमांना थकलेल्या आवाजात माहिती माहिती देताना सांगितले की,मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही. पण काँग्रेस पक्षात राहून सक्रिय राहणार असे सांगितले .शिंदेच्या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून कोणता नवा चेहरा येईल याची उत्सुकता लागली आहे. भारतीय जनता पार्टी खासदारकीला नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वाटचालीवर बोलताना शिंदे म्हणाले , काँग्रेसला कधी सत्ता येते, याची काळजी नाही. काँग्रेसच्या वाटचालीमध्ये तीन-चार वेळा सत्तांतर झाली आहे, तरीपण काँग्रेस आजतागायत टिकली. सोनिया गांधी यांच्यासारख्या नेत्या ज्या परदेशी असूनही काँग्रेस नेटाने चालवली आहे. काँग्रेस कधी संपणार नाही, असा दावाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनी केला.
२०१४ व २०१९ असे दोन वेळा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदेना भाजपकडून पराभव पत्करावा लागला.सुशीलकुमार शिंदे यांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केली आहेत.काँग्रेस भवन येथे गुरुवारी सकाळी आले असता,सुशीलकुमार शिंदे वयाने व मनाने खचले आहेत की काय असे दिसून आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी थकलेल्या आवाजात,जड अंत:करणाने स्पष्ट सांगितले,मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही. शिंदेंच्या आवाजातून व त्याच्या दाढी न केलेल्या चेहऱ्यावरून एक थकेलला राजकारणी असे दिसून आले.