• Tue. Apr 29th, 2025

भाजपला रोखले नाही तर हुकूमशाहीचा धोका-खरगे

Byjantaadmin

Dec 29, 2022

मुंबई : देशाचे संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करायला निघालेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांना रोखले नाही तर हुकूमशाहीचा धोका अटळ आहे, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असे खरगे म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या वतीने बुधवारी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापनादिनानिमित्त चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खरगे पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेसने खरगे यांचे स्वागत करण्यात आले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन खरगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे  सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,  प्रदेश काँग्रेस  अध्यक्ष नाना पटोले  प्रा. वर्षां गायकवाड, कन्हैया कुमार, कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी या वेळी भाजप, मोदी आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असा प्रश्न मोदी विचारतात. मात्र, काँग्रेसने लोकशाही आणि संविधान वाचवल्यानेच तुम्ही पंतप्रधान होऊ शकलात, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ३० लाख जागा रिक्त असताना त्या मोदी सरकार का भरत नाही, असा सवाल खरगे यांनी केला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणार जागा भरल्या तर त्या गरिबांना व आरक्षणामुळे मागासवर्गीयांना मिळतील, ते त्यांना नको आहे, असे खरगे म्हणाले.

महाराष्ट्रात चोरांचे सरकार 

आमचे आमदार चोरून महाराष्ट्रात जे सरकार बनले आहे ते चोरांचे सरकार आहे, अशी टीका खरगे यांनी केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. परंतु. केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने आणि पाठिंब्याने पैशाच्या जोरावर, ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर करून धमक्या देऊन चुकीच्या पद्धतीने शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed