काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला ‘पप्पू’ उल्लेख करण्यावर कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. हा त्यांच्या प्रचाराचा भाग असल्याची टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत असताना ही मुलाखत घेण्यात आली होती. “यावरुन त्यांच्या मनातील भीती दिसते. ते निराश आहेत,” असं राहुल गांधी यांनी ‘The Bombay Journey’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
“मला कोणत्याही नावाने पुकारलं तरी त्यांचं स्वागत आहे. मला चांगलं वाटत आहे. कृपया माझं नाव वारंवार घेत जा,” असा टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला होता. ‘भारत जोडो’ यात्रेने सध्या विश्रांती घेतली असून ३ जानेवारीला पुन्हा सुरुवात होणार आहे
राहुल गांधी यांनी यावेळी इंदिरा गांधींबाबत बोलताना सांगितलं की “आयर्न लेडी म्हणण्याआधी त्यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटलं जात होतं. जे लोक माझ्यावर २४ तास हल्ला करत असतात तेच तिला ‘गुंगी गुडिया’ म्हणायचे. आणि एक दिवस ती अचानक ‘गुंगी गुडिया’वरुन आयर्न लेडी झाली. ती नेहमीच ‘आयर्न लेडी’ होती”. “ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. माझी दुसरी आई होती”, अशाही भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधींना यावेळी तुम्हाला तुमच्या आजीचे गुण असणाऱ्या महिलेसोबत संसार करायला आवडेल का? असं विचारलं असता ते म्हणाले “हा चांगला प्रश्न आहे. खरं तर माझी आई आणि आजीच्या गुणांचं मिश्रण असेल तर उत्तम”.
‘भारत जोडो’ यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचली असून सध्या विश्रांती घेण्यात आली आहे. ३ डिसेंबरला काश्मीर गेट येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यात्रेत सहभागी होणार आहेत.