• Tue. Apr 29th, 2025

रितेश-जिनिलियाच्या गाण्याने माधुरी,काजोललाही लावलं ‘वेड’

Byjantaadmin

Dec 28, 2022

रितेश-जिनिलियाच्या गाण्याने माधुरी,काजोललाही लावलं ‘वेड’

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्षित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसाच उत्तम प्रतिसाद आता या चित्रपटाच्या गाण्यांना मिळताना दिसत आहे. त्यांचे चाहतेच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांना या चित्रपटाच्या गाण्यांनी वेड लावलं आहे.
‘वेड’ या चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं आज प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसत आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिलाही या गाण्याने भुरळ घातली आहे.
माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या गाण्याचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “जेव्हा आपल्या प्रतिबिंबात कोणीतरी आपलं दिसतं तेव्हा वेडेपणातलं ‘सुख कळतं.’” यासोबतच तिने या गाण्याची लिंक ही शेअर केली आणि रितेश जिनिलीयाला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

‘वेड’ चित्रपटातील गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणलाही या गाण्याने भूरळ पाडली आहे.

काजोलने सुख कळले गाण्याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “निस्वार्थ प्रेमापेक्षा मोठं वेड काय असू शकतं?”, असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावणार का, हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed