मुंबई : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापने 24 तास खुली राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय जुनाच असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीचे परिपत्रक शासनाने काढले आहे. पण, यामध्ये मद्यविक्री करणारे वाईन शॉप्स बार आणि परिमिट रुम 24 तास खुली राहणार का? याबाबतही शासनाचे स्पष्टपणे निर्देश दिले आहेत.मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापनांना 24 तास खुले ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 2 (2) मध्ये दिवस याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरु होणारा 24 तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व दुकाने निवासी हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा या गोष्टींना 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) नुसार आठवड्यातील सर्व दिवस व्यवसायकरीता येणार आहे. पण, इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणेही बंधनकारक असणार आहे. यामध्ये व्यापारी संकुले आणि मॉल्सबाबत वेळा निश्चित करण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत.
दारुच्या दुकानांबाबतही या परिपत्रकात महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध क्षेत्रातील मद्य विक्री व मद्य पुरवणाऱ्या दुकानांच्या उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक तसंच अशी कुठलीही ठिकाणं जिथं मद्य विक्री केली जाते. तसेच वाईन आणि इतर मद्य विक्री करणारी दुकानं यांचा समावेश असून ही दुकाने ही 24 तास खुली राहणार नाहीत. स्थानिक प्रशासनाकडून अथवा पोलीस विभागाकडून दारुच्या दुकानांशिवाय इतर दुकाने 24 तास खुली ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत असल्याच्या तक्रारी आणि विविध निवेदन शासनाकडे प्राप्त झाली होती. त्याचबरोबर विविध लोकप्रतिनिधींकडून देखील याबाबतच्या तक्रारी येत असल्याने 2017 च्या या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश शासनाने सध्याच्या परिपत्रकातून जारी केले आहेत.
