तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केले, सात जणांना अटक
निलंगा : साई सोसायटी येथील खदानीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी माझ्या मुलीच्या मरणास जबाबदार आहेत. तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या सात जणांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी गोरोबा रामराव कांबळे (रा. आंबेडकरनगर, निलंगा) यांची मुलगी पौर्णिमा गोरोबा कांबळे (२९ ) हिने शहरातील दापका हद्दीत असलेल्या येथील साईनगर सोसायटी येथील खदानीतील पाण्यात उडी मारून २५ सप्टेंबर रोजी ५ वाजता आत्महत्या केली होती. माझ्या मुलीस लग्नाचे अमिष दाखवून जातीवाचक शिवीगाळ करून तू मातंग समाजाची आहेस. मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही म्हणून माझ्या मुलीस त्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सूरज विजयकुमार मुळे (वय २९ वर्षे), वडील विजयकुमार शेषराव मुळे, आई शकुंतला विजयकुमार मुळे, भाऊ धीरज विजयकुमार मुळे (रा. साईनगर, दापका) मामा बी.झेड. जाधव (रा. नळेगाव) ऑटोचालक अनिकेत याच्यासह सात जणांवर निलंगा पोलीस ठाण्यात २९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वजणांना पोलिसांनी अटक केली आहे. डान्स क्लासेसच्या माध्यमातून पौर्णिमा व सूरज यांची ओळख झाली होती. फोनवर सतत दोघेही बोलायचे, त्यातच त्यांचा संपर्क वाढला. एकमेकांच्या प्रेमात पडले, परंतु प्रेमविवाहला मुलाकडील कुटुंबातील लोकांचा विरोध होता. त्यानंतर मात्र सूरजने संपर्क कमी केला व पुणे येथे गेला. फोन नंबर ब्लॉक करून ठेवल्याने या मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
