• Wed. Oct 15th, 2025

विलास साखर कारखान्यात कौशल्याबाई माने यांचा विक्रम: हार्वेस्टरद्वारे ९ हजार मे. टन ऊसतोडणी !

Byjantaadmin

Oct 1, 2025

विलास साखर कारखान्यात कौशल्याबाई माने यांचा विक्रम: हार्वेस्टरद्वारे ९ हजार मे. टन ऊसतोडणी!

चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल स्वागत करून केले कौतुक

लातूर प्रतिनिधी,:
लातूर तालुक्यातील निवळी येथील श्रीमती कौशल्या हनुमंत माने यांनी सन २०२४-२५
या गळीत हंगामामध्ये हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी आणि वाहतूक करून तब्बल विलास सहकारी
साखर कारखान्यास ९,३०८ मे. टन ऊसतोडणी आणि वाहतूक करून ऊसतोडणी हार्वेस्टर
ठेकेदार म्हणून कारखान्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नवरात्रात आई जंगदबेचा जागर सुरु सअतांना विलास सहकारी साखर कारखान्यात शेती
व्यवसायात महिला शक्ती आणि आधुनिक यांत्रिकीकरणाचा प्रभावी समन्वय साधत, निवळी,
ता. लातूर येथील कौशल्याबाई हनुमंत माने यांनी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी
आज, बुधवार, १ ऑक्टोबर रोजी बाभळगाव निवासस्थानी कौशल्याबाई माने यांच्या या
अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांचे स्वागत करून कौतुक केले. या यशाने विलास साखर
कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण उद्योगात आर्थिक क्रांती घडवण्याची यांत्रिकीकरणाची
क्षमता सिद्ध झाली आहे.

मांजरा परिवाराची साखर कारखानदारी ठरली पथदर्शी

मांजरा परिवार साखर कारखानदारीत नवे प्रयोग करण्यात नेहमीच आघाडीवर राहिला
आहे. आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख विलास कारखान्याचे चेअरमन असताना, विलास कारखान्याने प्रथमतः
ऊसतोडणी यंत्राचा (हार्वेस्टर) वापर सुरू केला. आज देशातील स्वदेशी आणि विदेशी
कंपन्यांच्या एकूण हार्वेस्टरपैकी २००० पेक्षा अधिक यंत्रे फक्त महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

यांत्रिकीकरण: काळाची गरज आणि प्रचंड रोजगार निर्मिती

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनाने मांजरा परिवाराने
काळाची गरज ओळखून ऊसशेती यांत्रिकीकरणाला चालना दिली. हार्वेस्टर खरेदीसाठी लातूर
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख यांनी हार्वेस्टर खरेदी योजना
राबविण्यासाठी पुढाकार घेतला. यांत्रिकीकरणामुळे कमी खर्चात व वेळेत काम पूर्ण होत
असल्याने शेती परवडणारी ठरते, ज्यामुळे युवक वर्ग शेती व्यवसायात अधिक रस घेत आहे.

ऊसतोडणीसाठी मजूर मिळत नसल्याची अडचण यंत्रांमुळे दूर झाली. विशेष म्हणजे, एका
ऊसतोडणी यंत्राबरोबर सरासरी १० ट्रॅक्टर चालतात, ज्यामुळे प्रचंड रोजगार निर्मिती झाली
आहे. शेतकऱ्यांची मुले ही यंत्रे चालवत असल्याने बेकारीचा प्रश्न सोडण्यास मदत झाली आहे.
यंत्राने ऊस तोडल्यास त्याचे वजन अधिक भरते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा थेट आर्थिक फायदा
होतो.

विलास कारखान्याची महिला सभासदांना प्राथमिकता

विलास सहकारी साखर कारखान्याने ऊस यांत्रिकीकरणाला विशेष महत्त्व दिले आहे.
कारखान्यावर एकूण ४१ हार्वेस्टर आणि २२० मिनी ट्रॅक्टर कार्यरत आहेत. कौशल्याबाई माने
यांनी कारखाना हार्वेस्टर योजनेतून हार्वेस्टर यंत्र खरेदी केले. कारखान्याकडून आपल्या २,८७४
महिला सभासदांना प्राधान्य देऊन त्यांना आधुनिक ऊस शेतीचे ज्ञान मिळावे यासाठी
कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यामार्फत ‘लक्ष्मी ज्ञानयाग’ प्रशिक्षण दिले
जाते. ऊसतोडणी यंत्रासाठी पहिली गुंतवणूक मोठी (सुमारे १ कोटी रुपये) असली तरी, जिल्हा
बँकेच्या मदतीने हे शक्य झाले आहे. हे यंत्र वर्षातून ४ ते ५ महिने चालत असले तरी
मालकाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने ही गुंतवणूक अत्यंत फायद्याची ठरली
आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख
यांनी कौशल्याबाई हनुमंत माने यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी
करुन त्यांनी हार्वेस्टरद्वारे ९,३०८ मे. टन ऊसतोडणी आणि वाहतूक करून प्रथम क्रमांक
पटकावला आहे. या कामगिरीबद्दल बाभळगाव निवासस्थानी त्यांचे स्वागत करून कौतुक
केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *