साथीच्या रोगांपासून जनावरांच्या संरक्षणासाठी लातूर ग्रामीण मध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते धिरज विलासराव देशमुख यांची पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कडे मागणी
लातूर :– अतिवृष्टी,पूर यामुळे मानवी जीवनासह पशुधन पिकांचे व मालमत्तेचे नुकसान तसेच पायाभूत सुविधांची हानी झाली आहे तर दुसरीकडे हवामानातील बदल व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी हे अतिवृष्टीशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे जनावरांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. साथीच्या रोगापासून जनावरांना संरक्षण मिळण्यासाठी लातूर, रेणापूर व औसा या तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण शिबीराचे आयोजन करावे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
या शिबीरांमध्ये जनावरांना आवश्यक औषधे आणि लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करावा आणि भविष्यात अशा घटना अधिक वारंवार आणि विनाशकारी होण्याची शक्यता असल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणून या संदर्भात पशुपालकांमध्ये जनजागृती करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
तरी लातूर, रेणापूर व औसा या तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजन करण्या संदर्भात संबंधितास आदेशित करावे,असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
