“ग्रीन गोल्ड” संशोधनातून लातूरचा गौरव; परवेज पाशा पटेल यांना कलिंगा विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी
लातूर :“बांबू” ही वनस्पती कार्बन शोषण, मृदा संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी म्हणून ग्रीन गोल्ड या नावाने ओळखली जाते. मात्र, गुणवत्तापूर्ण व रोगमुक्त रोपांची कमतरता ही सर्वांत मोठी अडचण मानली जाते. या पार्श्वभूमीवर फिनिक्स फाऊंडेशन लोदगा चे समन्वयक परवेज पाशा पटेल यांनी कलिंगा विद्यापीठ, रायपूर येथे केलेल्या संशोधनातून किफायतशीर ऊतीसंवर्धन पद्धती विकसित करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या कृषी महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांचे पुढचं पाऊल म्हणून ‘ पाशा पटेल स्किल टेक युनिव्हर्सिटी’ राज्य सरकारच्या परवानगीच्या अंतिम टप्प्यात असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाचे अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होणार आहेत, संस्थेचे संस्थापक माजी आमदार राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ पूर्णपणे बांबू संशोधन आणि विकासासाठी काम करणार आहे, बांबूतील या शिक्षणाचा निश्चितपणे विद्यापीठाच्या आगामी कार्याला फायदा होईल असा विश्वास डॉ. परवेज पटेल यांनी व्यक्त केला आहे.
संशोधनाचा गाभा
पटेल यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू म्हणजे कमी खर्चात, रोगमुक्त व एकसारखी बांबू रोपे मोठ्या प्रमाणावर तयार करणे.पोषक माध्यमांचे पर्यायी स्रोत, हार्मोन उपचारांचे अनुकूलन आणि रोपांचे रोपवाटिकेत संवर्धन या गोष्टींवर त्यांनी यशस्वी प्रयोग केले.या पद्धतीमुळे बांबूच्या मोठ्या प्रमाणावर उपलब्धतेला गती मिळणार आहे.
शाश्वत विकासाचा मार्ग
या संशोधनाचे महत्त्व फक्त प्रयोगशाळेतच मर्यादित नसून,वनीकरण मोहिमा,कार्बन शोषण प्रकल्प ,बांबू आधारित उद्योग यांना मोठी चालना मिळणार आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
लातूरचा अभिमान
परवेज पटेल यांचे संशोधन हे लातूरच्या शैक्षणिक परंपरेला एक नवे पर्व घडवणारे ठरले आहे. त्यांचा प्रबंध केवळ शैक्षणिक योगदान न राहता, तो शेतकरी, उद्योजक व पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
