• Thu. Oct 16th, 2025

व्यक्तिमत्व विकासाची जननी म्हणजे; राष्ट्रीय सेवा योजना-डॉ. गणेश बेळंबे 

Byjantaadmin

Sep 26, 2025

 

निलंगा:-  विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हा अलीकडे फार महत्त्वाचा घटक झालेला आहे. बाह्य आणि अंतर्गत होणारे सकारात्मक बदल हा व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतला तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. समाजाला ज्ञान देणारी शाळा म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांना मत व भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य हे राष्ट्रीय सेवा योजनेमुळे प्राप्त होते. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सभाधिटपणा निर्माण होतो. म्हणून व्यक्तिमत्त्व विकासाची जननी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. असे मत डॉ. गणेश बेळंबे  यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्बोधन शिबिरात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देश प्रेम, वैचारिक प्रगती, सामाजिक कार्याची जाणीव यांचे धडे रा.से.यो. मध्येच मिळतात.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी भय- भ्रम- भूक या तीन घटकांमुळे समाज ग्रासलेला आहे, यातून समाजाला बाहेर काढायचे असेल तर युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. या ज्वलंत प्रश्नावर विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड यांनी रा.से.यो. गीत व स्फूर्ती गीत सादर करून प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार केली. कार्यक्रमाचा उद्देश कार्यक्रमाधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी प्रास्ताविकेतून मांडला तर आलेल्या मान्यवरांचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवरुद्र बदनाळे यांनी मानले. याप्रसंगी विचार मंचावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या गीताच्या माध्यमातून केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गणेश वाकळे ,श्री. सिद्धेश्वर कुंभार व रा.से.यो.चे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *