अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी सरकार बांधील अजित पाटील कव्हेकरांनी नुकसानीची पाहणी करून दिला धीर
लातूर प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. काही भागात तर विक्रमी पाऊस पडला आहे. या पावसाने लातूर शहरातील काही भागामध्ये पाणी पाणी झाले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्याची नासाडी झालेली आहे. या अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी सरकार बांधील असून प्रशासनाकडून तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असा विश्वास देऊन या संकटकाळात पक्ष आणि सरकार आपल्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील सम्राट अशोक नगर, राजीव नगर, प्रबुद्ध नगर, महादेव नगर, संजय नगर, ईस्लामपुरा, प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, कुष्ठधाम सोसायटी मधील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्याकडून करण्यात आली. यावेळी सरचिटणीस रवी सुडे, मंडल अध्यक्षा निर्मला कांबळे, मधुसूदन पारीख, ललित तोष्णीवाल, प्रमोद गुडे, संजय गिर, दत्ता चेवले, राजकुमार गोजमगुंडे आदि समवेत होते.
लातूर शहरात यावर्षी विक्रमी पाऊस झालेला असून काही भागांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगून अजित पाटील कव्हेकर यांनी या संकटकाळात नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले. या संकटात नागरिकांच्या पाठीशी सरकार आणि पक्ष खंबीरपणे उभा असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत देण्यासाठी सरकार बांधील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आगामी काळात याप्रकारची संकटे येऊ नये यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होण्यासाठी आपण स्वतः शासन दरबारी वकिली करू असा शब्द अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी दिला.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरु झालेले असून ज्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे झाले नाहीत त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे सांगून सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला सरकारकडून निर्देश देण्यात आलेले असून या कामात कोणतीही दिरंगाई झाल्यास तात्काळ सांगावे असे आवाहन ही अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी केले. या संकटकाळात कोणीही धीर सोडू नये असे सांगून नुकसानग्रस्तांच्या पाठीशी पक्ष आणि सरकार ठामपणे उभे आहे अशी ग्वाही यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
यावेळी काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडून आम्हाला अद्यापपर्यंत कबाले देण्यात आलेले नाहीत असे सांगितल्यानंतर यासाठी मनपा प्रशासनाला सूचना करण्यात येईल आणि लवकरात लवकर कबाले देण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास देण्यात आला. यावेळी मुन्ना हाश्मी, किशोर शिंदे, रत्नमाला घोडके, अनिल सुर्यवंशी, सोनू बनकर, कुमार जाधव, बाळू शिंदे, आकाश खैरमोडे, देवानंद कांबळे आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
