जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली पाहणी*
पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन
लातूर , दि. २५ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळकोट तालुक्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.जळकोट तालुक्यातील चेरा येथील उत्तमराव माने या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून सहकारमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच या संदर्भात मदतीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
सहकार मंत्री श्री. पाटील यांनी पाटोदा खुर्द, तिरुका, माळहिप्परगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. तसेच राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच २४४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत लवकरात लवकर वितरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी वाढीव मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माळहिप्परगा येथे शान सूर्यवंशी, वैभव गायकवाड, तर तिरूका येथील सुदर्शन माधव घोणशेट्टे पुरात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या तिघांच्या कुटुंबियांची भेट घेवून सहकार मंत्री श्री. पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.यावेळी जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिमा कांबळे, उपनगराध्यक्ष जळकोट मन्मथ किडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, संग्राम हासुळे पाटील, तहसीलदार राजेश लांडगे, पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी एस. आर. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, गजानन दळवे पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
